कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार?, सांगलीतील संघटनांकडून वेळापत्रकासह दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:36 IST2025-03-25T13:36:25+5:302025-03-25T13:36:53+5:30
सांगली : तोट्यात असणारी कोल्हापूर -कलबुर्गी एक्स्प्रेसला सांगलीत थांबा दिल्यास ती फायद्याच्या ट्रॅकवर धावू शकते, असा विश्वास सांगलीतील प्रवासी, ...

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार?, सांगलीतील संघटनांकडून वेळापत्रकासह दावा
सांगली : तोट्यात असणारी कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसला सांगलीत थांबा दिल्यास ती फायद्याच्या ट्रॅकवर धावू शकते, असा विश्वास सांगलीतील प्रवासी, व्यापारी संघटनांनी दिला आहे. त्यादृष्टीने काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर नियोजित वेळापत्रकही तयार करून टाकले आहे.
कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडीतील अनेक तिकिटस् शिल्लक असतात. त्यामुळे ही गाडी सांगलीमार्गे चालवावी म्हणजे सांगलीचे अतिरिक्त प्रवासी या गाडीला मिळतील व गाडी भरून धावू लागेल. गाडीचे उत्पन्न वाढून ती फायदेशीर ठरेल, असे चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी सुचविले होते.
कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या श्रेणीत मोडते. कोल्हापूर-कलबुर्गी गाडी सांगलीमार्गे धावली तर त्याला फक्त १५ मिनिटे जास्त वेळ लागणार. त्यामुळे ही गाडी सुपरफास्टच्या श्रेणीमधून एक्स्प्रेसच्या श्रेणीत जाईल. त्यामुळे या गाडीची तिकिटे ३० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात. प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल व जास्त प्रवासी या गाडीतून प्रवास करतील, असाही दावा केला जात आहे.
समाजमाध्यमांवर टाकलेले वेळापत्रक
कोल्हापूरहून ही गाडी दुपारी २.२४ वाजता सुटून, हातकणंगले, जयसिंगपूर या स्थानकावरून मिरजेत दुपारी ३.४० ला येईल. पाच मिनिटे थांबून ती सांगलीत ३.५९ ला पोहचेल. सांगलीतून ४.२० वाजता ती निघून पुन्हा मिरजेत ४.३५ ला येईल. ४.४५ ला ती सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट रोड, गाणगापूर रोड स्थानकावरून रात्री १०.४५ वाजता कलबुर्गीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात सकाळी ६.४० वाजता कलबुर्गीतून निघालेली ही गाडी मंजूर थांबे करुन मिरजेत दुपारी १२.१० वाजता पोहचेल. तिथून सव्वा बारा वाजता सांगलीला रवाना होईल. सांगलीत १२.२८ वाजता पोहोचल्यानंतर १२.४३ ला ती मिरजेकडे रवाना होईल. मिरजेतून १.०२ मिनिटांनी ती कोल्हापूरकडे रवाना होईल. कोल्हापुरात दुपारी सव्वा दोन वाजता ती पोहोचेल.