Sangli Crime: चारित्र्यावरुन संशय, झोपेत असतानाच पत्नीचा बांबूने मारून निर्घृण खून; फरार पतीला काही तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:23 IST2025-06-27T16:23:19+5:302025-06-27T16:23:41+5:30

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटक

Wife murdered with bamboo due to suspicion of character in sangli | Sangli Crime: चारित्र्यावरुन संशय, झोपेत असतानाच पत्नीचा बांबूने मारून निर्घृण खून; फरार पतीला काही तासांत अटक

Sangli Crime: चारित्र्यावरुन संशय, झोपेत असतानाच पत्नीचा बांबूने मारून निर्घृण खून; फरार पतीला काही तासांत अटक

सांगली : चारित्र्याच्या संशयावरून बांधकाम कामगार पतीने पत्नी शीलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली) हिचा बांबूने कपाळावर व डोक्यावर हल्ला करून निर्घृण खून केला. गुरुवारी पहाटे हा प्रकार घडला. खुनानंतर पती पिंटू पाटील (वय ३६) हा दोन लहान मुलांना घेऊन पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथून त्याला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे. काही वर्षांपासून तो सांगलीत राहताे. गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील परंतु सांगलीत हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. सध्या विजयनगरजवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते. तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती दोन मुलांसह राहत होते. शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचे काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता.

काही दिवसांपासून पिंटू याला शीलवंती हिच्या चारित्र्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात सतत वाद होता. तशातच शीलवंती दि. १३ जून रोजी घर सोडून निघून गेली होती. पिंटूने संजयनगर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. शीलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती घराकडे परत आली होती. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण सुरूच होते. शीलवंती परत आल्यानंतर पिंटूने संजयनगर पोलिसांना सांगितले नव्हते.

बुधवारी रात्री पिंटू आणि शीलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर शीलवंती झोपल्यानंतर झोपेत असतानाच तिच्या डोक्यावर व कपाळावर बांबूने मारून खून केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला. पिंटूने पलायन केल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना कळवले.

त्यानंतर संजयनगर पोलिसांनी बांधकाम सुरू असलेले ठिकाण शोधले. शेडची कडी काढल्यानंतर आतमध्ये शीलवंती पाटील हिचा खून झाल्याचे आढळून आले. परिसरातील नागरिकांना माहिती समजताच त्यांनी गर्दी केली होती. संजयनगरचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर तपासाबाबत सूचना केल्या.

गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून अटक

पिंटू पाटील हा खुनानंतर दोन्ही मुलांना घेऊन गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि संजयनगर पोलिसांचे पथक मंगळवेढा, सांगोला तालुक्याकडे रवाना झाले. आंत्रोळी (ता. मंगळवेढा) येथे गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या ताब्यात आणून दिले.

नातेवाइकांचा आक्रोश

शीलवंती पाटील हिची आई, भाऊ तसेच हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांना तिच्या खुनाची माहिती मिळताच ते दुपारी घटनास्थळी आले. त्यांनी शीलवंतीचा मृतदेह पाहून आक्रोश केला. शीलवंतीचा भाऊ आणि आई यांना तिच्या मृत्यूचा धक्का बसल्याचे दिसून आले.

Web Title: Wife murdered with bamboo due to suspicion of character in sangli