सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

By अविनाश कोळी | Updated: January 3, 2025 13:11 IST2025-01-03T13:11:02+5:302025-01-03T13:11:31+5:30

भाजप की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे जाणार, याची चर्चा

Who will get the post of Guardian Minister of Sangli district, confusion remains | सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?, संभ्रम कायम 

अविनाश कोळी

सांगली : विधानसभा निवडणुका होऊन महिना लोटला असून, सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदांचेही वाटप झाले. मात्र, पालकमंत्रिपदाचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार, याची चर्चा सध्या रंगली आहे. भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे हे पद जाणार, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद जाणार, हे निश्चित झाले आहे. मात्र, ते कोणाला मिळणार, याबाबतचे चित्र स्पष्ट नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव सांगलीच्या पालकमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. त्याचवेळी पुण्याच्या पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतही चंद्रकांत पाटील असल्याने त्यांना नेमके कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व मिळणार, याकडे स्थानिक भाजप नेत्यांचे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शेजारील जिल्ह्यातील मंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र, सांगलीतील भाजपच्या नेत्यांनी भाजपलाच पालकमंत्रिपद मिळावे म्हणून पक्षाकडे आग्रह धरल्याचे समजते.

जिल्ह्यात भाजपचा झेंडा, तरीही मंत्रिपदाला ठेंगा

जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत आठपैकी चार जागा जिंकल्या. २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी दुप्पट जागा मिळविल्या. क्रमांक एकचा पक्ष म्हणून भाजपने झेंडा रोवल्यानंतरही सरकारमध्ये सांगलीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आले नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे.

आघाडीच्या काळाशी तुलना

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात सांगली जिल्ह्याच्या वाट्याला किती महत्त्वाची मंत्रिपदे येत होती, याचे उदाहरण देत मंत्रिपदासाठी अद्याप आग्रह कायम ठेवला आहे.

पतंगराव कदम यांच्याकडे दीर्घकाळ पद

राज्यात २०१४ पूर्वी पंधरा वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या काळात पतंगराव कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषवले. आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्याकडे काही काळ पतंगराव कदम यांच्यापेक्षा महत्त्वाची खाती होती, मात्र जिल्ह्याचे पालक म्हणून नेहमी पतंगरावांनी स्थान भूषवले आणि प्रभावी कामही केले होते. त्या काळात जयंतरावांकडे नवी मुंबईची, तर आर. आर. आबांनी मागणी करीत गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती.

पालकमंत्रिपद सर्वच बाबींसाठी महत्वाचे

पालकमंत्री हे पद कोणत्याही जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचे असते. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधी खर्चाची, वाटप नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर असते. नियोजन समितीसह विषय समित्यांच्या निवडींचे अधिकारही पालकमंत्र्यांनाच असतात. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, याकडे राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेचे लक्ष आहे.

Web Title: Who will get the post of Guardian Minister of Sangli district, confusion remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.