सांगली जिल्ह्यात काही गावात पाणीटंचाई; आठवड्यातून एकदा मिळतेय पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:57 IST2025-02-18T17:56:28+5:302025-02-18T17:57:19+5:30
सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही ...

संग्रहित छाया
सांगली : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील अनेक गावांत टँकरचे वारे वाहू लागते. दरवर्षीचा उन्हाळा जिल्ह्यात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही काही ठिकाणी पाणीटंचाई आहे. वीजटंचाई, नियोजनाचा अभाव आणि पाण्याचा बेदरकार वापर ही पाणीटंचाईची कारणे आहेत.
फेब्रुवारी महिना असूनही जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सांगली, मिरजेसारख्या शहरांमध्ये अजून तरी पाण्यावरून स्फोटक स्थिती तयार झालेली नाही. काही शहरे आणि गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे कारण नैसर्गिक कमी आणि नियोजनाचा अभाव हेच अधिक दिसते. टँकरची गरज ही लोकांपेक्षा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचीच अधिक असल्याचे जाणवते. सध्या सुमारे पंचवीसभर गावे आणि वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. यात सर्वाधिक टँकर जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांत लागण्याची शक्यता आहे.
महापालिका क्षेत्रातील काही विस्तारित भागातही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे, मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. अग्निशमन दलाचे तसेच पाणीपुरवठा विभागाचे काही टँकर तेथे पाणीपुरवठा करतात.
जत, आटपाडीत जानेवारीपासून उन्हाळा!
जत आणि आटपाडी तालुक्यात जानेवारीपासूनच पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. विशेषतः जत तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.
टोलेजंग इमारती, दर १५ फुटांवर बोअर
महापालिका क्षेत्रात टोलेजंग इमारतींच्या जंगलात दर १५ फूट अंतरावर रहिवाशांकडून बोअर खोदण्यात आल्या आहेत. सांगली, मिरजेतील विस्तारित भागातील काही उपनगरात अनेक वर्षांपासून टँकरनेच पाणी पुरविले जाते.
टँकर आता सुरू; पुढे काय?
जिल्ह्यात काही भागात टँकरने सध्या सुरळीत पाणीपुरवठा सुरू असला तरी ऐन एप्रिल, मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यावेळी जिल्हाभरात टँकरची मागणीही वाढणार आहे.
पाणी आले की लाइट गायब होते
- ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या पाणीयोजनांचे मूळ स्त्रोत आटू लागले आहेत.
- काही ठिकाणी तब्बल आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
- मात्र पाणी येताच वीजपुरवठा गायब होत असल्याने पाण्याचा उपसा मुश्कील झाला आहे.
नळ कोरडे; गल्लीत पाट वाहताय
काही गावांत पाणी योजनांना मोठी गळती आहे. तेथे घरोघरी नळ कोरडे आहेत, मात्र मुख्य वाहिनीच्या गळतीमुळे रस्तोरस्ती पाण्याचे धो-धो पाट वाहताना दिसतात.
टँकर अन् जारच्या टेन्शनने बेजार!
ही गावे टँकर आणि जारच्या टेन्शनने हैराण आहेत. गावोगावी खासगी फिल्टर प्रकल्प सुरू झाले असून, तेथे पाण्याची विक्री सुरू आहे.
गावात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. पाणीयोजनेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तलावात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र योजनेला गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पिण्याचे पाणी विकत आणतो; मात्र वापराचे पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करायला हवी. - राजेंद्र पाटील, ग्रामस्थ, आरग (ता. मिरज)