मध्यप्रदेशमधील ईव्हीएम मशीनवर सांगलीत आठ ठिकाणचे मतदान; कंट्रोल, बॅलेट युनिट प्रशासनाच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:47 IST2025-11-27T18:46:46+5:302025-11-27T18:47:53+5:30
Local Body Election: तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली

संग्रहित छाया
सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायत निवडणुका २ डिसेंबरला होणार आहेत. त्यासाठी निवडणूक शाखेने मतदान यंत्र आणि मतदान केंद्र निश्चित केली आहेत. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी जिल्हा शाखेकडून मध्य प्रदेशातून ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट मशीन प्राप्त झाली आहेत. तपासणी केल्यावर मतदान यंत्र प्रशासनाने सर्व आठ पालिकांच्या ठिकाणी पाठवली आहेत.
जिल्ह्यातील उरुण - ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतींच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दुसरीकडे, जिल्हा निवडणूक शाखेने मतदान केंद्रे आणि ईव्हीएम मशीनची संख्या निश्चित केली आहे. सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट तपासणी करून सज्ज ठेवले आहेत.
प्रत्येक ईव्हीएम मशीन तपासणी केल्यावर प्रत्येक नगरपालिका मुख्यालयात पाठवण्यात आले आहेत. हे मशीन मध्य प्रदेशातून मागवण्यात आले आहेत आणि जिल्ह्यातील निवडणुका या मशीनवर होणार आहेत. टेक्निशियन विभागाने सर्व यंत्रांची तपासणी केली आहे तसेच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ईव्हीएम मशीनची संख्या पुढीलप्रमाणे
पालिका / कंट्रोल युनिट संख्या / बॅलेट युनिट संख्या
उरूण-ईश्वरपूर / ९७ / २००
विटा / ७५ / १५०
आष्टा / ५३ / १०६
तासगाव / ६३ / ११५
जत / ५० / ९०
पलूस / ४० / १२०
शिराळा / ३६ / ७२
आटपाडी / ५६ / ११२
एकूण / ४७० / ९६५
जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी २९१ मतदान केंद्रे असून, ४७० कंट्रोल युनिट आणि ९६५ बॅलेट युनिट तपासणी करून संबंधीत नगरपालिकांच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवली आहेत. यावर्षी शाईऐवजी मार्कर पेनने मतदारांच्या हातावर खूण करण्यात येणार आहे, त्यासाठी १,००४ पेन खरेदी केले आहेत. - डॉ. पवन म्हेत्रे, प्रभारी सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा