Sangli Municipal Corporation Election: मतदारवाढ ३० हजाराची, प्रभागात घट दीड हजाराची; मतदार कुठे गेले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:41 IST2025-12-01T18:39:19+5:302025-12-01T18:41:10+5:30

गत निवडणुकीच्या तुलनेत अनेक ठिकाणी कमी मतदार

Voter increase of 30000 in Sangli Municipal Corporation decrease of 1500 thousand in the ward; Where did the voters go | Sangli Municipal Corporation Election: मतदारवाढ ३० हजाराची, प्रभागात घट दीड हजाराची; मतदार कुठे गेले? 

Sangli Municipal Corporation Election: मतदारवाढ ३० हजाराची, प्रभागात घट दीड हजाराची; मतदार कुठे गेले? 

शीतल पाटील

सांगली : महापालिकेच्या २०१८ च्या निवडणुकीनंतरच्या सहा वर्षांत शहरातील मतदारसंख्येत तब्बल ३० हजारांची वाढ झाल्याचे प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट झाले; पण प्रत्यक्षात काही प्रभागांमध्ये १५०० ते दोन हजार मतदारांची घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘यामुळे हे मतदार कुठे गेले?, यादीतून नावे कशी हटली? मतदारसंख्या वाढतेय म्हणतात, मग प्रभागात घट कशी?’ असे प्रश्न उमेदवार आणि नागरिकांना पडले आहेत. २०१८च्या तुलनेत शहराची लोकसंख्या, स्थलांतर, नवीन वसाहतींमुळे मतदारसंख्येत वाढ होणे स्वाभाविक असताना काही प्रभागांमधील गणित मात्र उलट झाले आहे.

महापालिकेने यंदाच्या निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार महापालिका निवडणुकीसाठी ४ लाख ५४ हजार मतदारसंख्या निश्चित झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीपेक्षा यंदा ३० हजारांनी मतदारांची वाढ झाली. ही वाढ ग्राह्य धरली तर प्रत्येक प्रभागात हजार ते दीड हजार मतदारांची वाढ होणे अपेक्षित होते. उलट प्रभागनिहाय मतदारसंख्येतील घसरण दीड ते दोन हजारांपर्यंत पोहोचत आहे. यादी तयार करण्यातील त्रुटी, स्थलांतरित मतदारांचे पत्ते अपडेट न होणे, मृत मतदारांची नावे काट्यातून काढण्यात झालेली नियमबाह्य गडबड, अथवा पुनर्आखणीतील तांत्रिक गोंधळ अशा कारणांमुळे मतदारसंख्या कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

‘एका बाजूला शहरात ३० हजार नवीन मतदार वाढल्याचे सांगितले जाते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या प्रभागात दोन हजार मतदार कमी दाखवले जातात. हा आकड्यांचा जादूई खेळ कशासाठी?’ असा थेट आरोप होत असून, या घोळावरून निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापले आहे. नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या कोअर टीमकडून मतदार याद्या पडताळून पाहण्याचे काम वेगात सुरू आहे. याद्यांमधील विसंगतीमुळे अनेकांनी निवडणूक विभागाकडे पुनर्तपासणीची मागणीही केली आहे. दीड ते दोन हजार मतदार एखाद्या प्रभागात निकाल बदलू शकतात, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

प्रभाग ७ मध्ये १९०० मतदार कमी

मिरजेतील प्रभाग सातमध्ये २०१८ साली २४ हजार १०५ मतदार होते. यंदाच्या मतदार यादीत २२१९७ मतदार आहेत. मतदारांची संख्या १९०७ ने कमी झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर यांनी महापालिकेकडे हरकतही दाखल केली आहे. मतदार गेले कुठे, असा सवाल करून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

प्रभाग १० मध्येही गोंधळ

वडर काॅलनीतील प्रभाग १० मध्येही मागील निवडणुकीत २५ हजार मतदार असताना यंदाच्या यादीत मात्र २३ हजार ४० मतदार आहेत. दोन हजार मतदार गायब असल्याचा आरोप माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केला. प्रभागाची सीमा गत निवडणुकीप्रमाणेच आहे. मग प्रभागातील मतदारांची संख्या कमी कशी झाली? उलट मतदारवाढ होण्याची गरज होती, असेही त्या म्हणाल्या.

शहरात वाढलेली संख्या कुठे गेली?

सात वर्षांत मतदारसंख्या वाढली असताना खणभागातील प्रभाग १६मध्ये ५०० मतदार कमी झाले असल्याचे माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगितले; तर प्रभाग १८ मध्ये २०१८ व २०१५ ची मतदारसंख्या जवळपास समानच आहे. तिथे कुठलीच वाढ अथवा घट दिसत नाही. मग शहरात वाढलेली मतदारसंख्या कुठे गेली, असा सवाल माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी उपस्थित केला.

Web Title: Voter increase of 30000 in Sangli Municipal Corporation decrease of 1500 thousand in the ward; Where did the voters go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.