Sangli: विटा नगरपालिकेचा १७१ वर्षांचा रंजक प्रवास, सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता कारभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:52 IST2025-11-21T18:50:56+5:302025-11-21T18:52:44+5:30
वामन फाटक यांची नगरपालिकेचे पहिले व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून निवड झाली. जिल्हा कलेक्टर हे कायम अध्यक्ष राहिले.

Sangli: विटा नगरपालिकेचा १७१ वर्षांचा रंजक प्रवास, सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता कारभार
दिलीप मोहिते
विटा : पूर्वीच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील विटा नगरपालिका ही सर्वांत जुन्या नगरपालिकांपैकी एक मानली जाते. या नगरपालिकेची स्थापना दि. ३० मार्च १८५४ रोजी ब्रिटिशकालीन ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात झाली. नगरपालिकेचा कारभार प्रारंभी सातारा जिल्हा कलेक्टरच्या हुकमतीने चालत होता.
दरवर्षी तीन स्थानिक पंचांची नेमणूक कलेक्टरांकडून केली जात होती. तालुका मामलेदार हा पंच समितीचा एक भाग होता. पंचांचे कामकाज विनावेतन चालत होते. त्या काळी जकात, छापा आणि तपकीर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत होते. सन १८८१ मध्ये विट्याची लोकसंख्या ४ हजार ४७७ इतकी होती; तर १८८२-८३ मध्ये पालिकेचे उत्पन्न ९३० रुपये आणि खर्च ४८० रुपये होता. त्या काळात विटा गावाच्या भोवती वीस फूट उंचीचा गावकुस बांधलेला होता; तर शिक्षणासाठी केवळ एकच मराठी शाळा चालू होती. दि. ८ सप्टेंबर १८५३ रोजी विट्याच्या ग्रामस्थांनी इंग्रज कंपनीकडे स्थानिक स्वराज्य व्यवस्थेसाठी लेखी कबुली दिली.
दि. ३० मार्च १८५४ रोजी औपचारिकपणे विटा नगरपालिकेची स्थापना झाली. सन १८८३ मध्ये शासनाच्या ठरावानुसार विटा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. सन १८८५ मध्ये नागरिकांना मतदानाचा व प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला. त्याच वर्षी वामन फाटक यांची नगरपालिकेचे पहिले व्हाइस-प्रेसिडेंट म्हणून निवड झाली. जिल्हा कलेक्टर हे कायम अध्यक्ष राहिले. ही घटना विटा नगरपालिकेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरली. सन १८८५ मध्ये विटा नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली.
सन १८८५ मध्ये स्थापनेनंतर दर तीन वर्षांनी निवडणूक होऊ लागली. मात्र, सर्व कारभार जिल्हा कलेक्टर यांच्या हातात असल्याने तेच कायम अध्यक्ष राहिले; परंतु, दि. २४ जानेवारी १९१७ च्या सरकारी ठराव क्रमांक ४९६ ने सुधारणा करून सदस्य मंडळाला बहुमताने लोकनियुक्त सभासदांतून अध्यक्ष निवडता येऊ लागला. त्या काळात रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, धर्मशाळा आणि दिवाबत्ती यांसारख्या सोयी श्रीमंत नागरिकांच्या मदतीने आणि नगरपालिकेच्या निधीतून पुरवल्या जात होत्या. बदलत्या काळानुसार विटा शहराचा विकास झाला असून, आज ते आधुनिक सुविधांनी नटलेले आहे.
सन २०११च्या जनगणेनुसार शहराची लोकसंख्या ४८ हजार २८९
सन २०११ च्या जनगणनेनुसार विटा शहराची लोकसंख्या ४८ हजार २८९ इतकी आहे. स्थापनेपासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्याचा दीप प्रज्वलित ठेवणारी ही नगरपालिका पूर्वीच्या दक्षिण सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील एक अभिमानाचा भाग ठरली आहे.