पलूस–कडेगाववर ‘विश्वजित कदम’ यांचीच पकड; पण आता अपेक्षांची कसोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 19:29 IST2026-03-23T19:28:48+5:302026-03-23T19:29:47+5:30

सलग विजयांनी काँग्रेसचे वर्चस्व : जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान

Vishwajit Kadam's grip on Palus Kadegaon; But now the test of expectations | पलूस–कडेगाववर ‘विश्वजित कदम’ यांचीच पकड; पण आता अपेक्षांची कसोटी!

पलूस–कडेगाववर ‘विश्वजित कदम’ यांचीच पकड; पण आता अपेक्षांची कसोटी!

प्रताप महाडिक

कडेगाव : पलूस–कडेगाव विधानसभा मतदारसंघात अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मिळवलेले यश हे आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील संघटनशक्ती आणि अचूक नियोजनाचे फलित मानले जात आहे. पलूस नगरपालिकेपासून सुरू झालेली विजयाची घोडदौड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये अधिक भक्कम झाली. मात्र, या यशाला सातत्य देत जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आता त्यांच्या समोर उभे आहे.

मतदारसंघातील सर्व आठ जिल्हा परिषद जागांवर विजय आणि पंचायत समितीच्या १६ पैकी १४ जागांवर काँग्रेसने मिळवलेले यश हे संघटनात्मक बळाचे स्पष्ट दर्शन घडवते. बहुतांश ग्रामपंचायती आणि सहकारी संस्थांवरही काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. २०१८ मधील बिनविरोध निवड, २०१९ मधील विक्रमी मताधिक्याचा विजय आणि २०२४ मधील पुनरागमन या सलग यशामुळे डॉ. कदम यांचे नेतृत्व अधिक प्रभावी बनले आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या ११ जागांमागे त्यांचा मोलाचा वाटा राहिला असून, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार विशाल पाटील यांच्या सहकार्याने महाविकास आघाडीची सत्ता स्थापण्यात त्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, कडेगाव पंचायत समिती सभापतिपदी पुतणे डॉ. जितेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी भाचे ऋषिकेश लाड, तसेच पंचायत समितीत दिग्विजय कदम यांची निवड झाल्याने तिसऱ्या पिढीच्या नेतृत्वालाही बळ मिळाले आहे.

या सर्व यशामागे दिवंगत माजी मंत्री पतंगराव कदम यांनी उभारलेला भक्कम राजकीय आणि संस्थात्मक पाया असल्याचे मानले जाते. त्यांच्या काळातील विकासाचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न डॉ. कदम करत आहेत. मात्र, निधीवाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रार त्यांनी विधानसभेत केली होती. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असताना स्थानिक स्तरावर वर्चस्व टिकवणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरत आहे. एकूणच, पलूस–कडेगावमध्ये काँग्रेसचे वर्चस्व ठाम असले तरी आगामी राजकीय लढतीत हे यश टिकवून ठेवत विकासाची गती कायम राखणे, हीच डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.

कडेगाव नगरपंचायतीचे रणसंग्राम

आता सर्वांचे लक्ष कडेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीकडे लागले आहे. येथे सध्या भाजपची सत्ता असून, सत्ताधारी पक्ष नव्याने रणनीती आखत असल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत नगरपंचायतीत सत्तांतर घडवून आणणे हे डॉ. विश्वजित कदम यांच्यासमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे.

Web Title : पलूस-कडेगाँव पर विश्वजीत कदम की पकड़: अब अपेक्षाओं की कसौटी!

Web Summary : विश्वजीत कदम के नेतृत्व में कांग्रेस का पलूस-कडेगाँव पर दबदबा है, जिसने स्थानीय चुनावों में जीत हासिल की। बढ़ती अपेक्षाओं और भाजपा के प्रभाव के बीच इस सफलता को बनाए रखना एक महत्वपूर्ण चुनौती है, खासकर आगामी कडेगाँव नगर पंचायत चुनावों में। उनके नेतृत्व की एक महत्वपूर्ण परीक्षा है।

Web Title : Vishwajit Kadam's Grip on Palus-Kadegaon: Now, a Test of Expectations!

Web Summary : Congress dominates Palus-Kadegaon under Vishwajit Kadam's leadership, securing victories in local elections. Maintaining this success amidst rising expectations and BJP's influence presents a significant challenge, especially in the upcoming Kadegaon Nagar Panchayat elections. His leadership faces a crucial test.