Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 17:59 IST2025-07-07T17:59:13+5:302025-07-07T17:59:43+5:30
आजी-माजी पदाधिकाऱ्यांची सांगलीत बैठक : जयश्रीताईंच्या प्रवेशानंतर काँग्रेसला आली जाग

Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू
सांगली : आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी रात्री बैठक घेतली आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचनाही डॉ. कदम यांनी कार्यकर्त्यांनी दिल्या.
पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेत्यांना अखेर जाग आली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांसह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची सांगलीतील भारती हॉस्पिटलच्या विश्रामगृहात बैठक झाली.
या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी महापौर किशोर जामदार, संजय मेंढे, मंगेश चव्हाण, विशाल कलगुटगी, काँग्रेसचे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची निवडणूकही होणार आहे. मागील काही दिवसांपासून महायुतीकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण केले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे शांत होते. या कारणांनी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते.
या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. कदम आणि खासदार पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागनिहाय कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
नगरसेवकांशी चर्चा
महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत माजी महापौरांसह नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे. याबाबत माजी नगरसेवकांना बोलावून स्वतंत्र प्रत्येकाशी बंद खोलीत संवाद साधण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्रभागातील स्थिती, निवडणुकीसाठी इच्छुकांबाबतची माहिती घेण्यात आली. तसेच कदम यांनीही माजी नगरसेवकांना निवडणुकीबाबत काही सूचना केल्या.
जिल्हा परिषदेला महाविकास आघाडी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही महाविकास आघाडी एकत्रित लढविणार आहे, असा विश्वास डॉ. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तुम्ही तयारीला लागा, आपण ताकदीने लढू, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.
जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चा
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढवल्या जाणार आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे, असेही दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.