विशाल नरवाडे सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:25 IST2025-08-27T16:24:40+5:302025-08-27T16:25:18+5:30
बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी झाले

विशाल नरवाडे सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती धोडमिसे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
सांगली : सांगलीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची बदली झाली असून त्या आता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारीपदी म्हणून काम पाहतील. त्यांची पदोन्नतीसह बदली झाली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विशाल नरवाडे यांची नियुक्ती झाली आहे. बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी झाले.
नरवाडे हे सोमवारी ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी बुलढाणा व धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. सांगलीत सहायक जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. नाशिकमध्येही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी उत्कृष्ट निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून २०२४ मध्ये त्यांना पुरस्कार मिळाला होता. दिल्लीत ग्रामीण विकास मंत्रालयात सहायक सचिव म्हणूनही काही काळ काम केले आहे.
मूळचे बुलढाण्याचे रहिवासी असलेल्या नरवाडे यांनी आयपीएस परीक्षेत यश मिळविले होते. २०१६ ते २०२० या काळात भारतीय पोलिस सेवेत अधिकारी म्हणून कामही केले, मात्र त्यानंतर प्रशासकीय सेवेकडे वळले.
धोडमिसे या २२ जुलै २०२३ पासून सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होत्या. त्यांनी २६ महिने या पदावर काम केले. प्रशासकीय शिस्तीसाठी त्यांनी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
‘माझा गावचा धडा’ हा अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गावाचा अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. वारकरी तालावर भक्तियोगाची विश्वविक्रमी कामगिरी केली. या उपक्रमाची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली. ई-फाईल प्रणालीमध्ये जिल्हा परिषद राज्यात प्रथम आणली. सोमवारी त्या पदभार सोडणार आहेत.
सांगलीचे सीईओ, उद्याचे जिल्हाधिकारी
सांगली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अधिकारी पुढे जिल्हाधिकारी होतात ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा बनली आहे. राजेंद्र भोसले बदलीनंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले. अभिजित राऊत जळगावला, तर जितेंद्र डुडी साताऱ्याला जिल्हाधिकारी म्हणून गेले. सध्या त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी आहे. आता धोडमिसे यादेखील सिंधुदुर्गला जिल्हाधिकारी म्हणून रुजू होत आहेत.