उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येवून तिसऱ्या मजल्यावरून पडले, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते विजयसिंह महाडिक यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 18:08 IST2025-04-18T18:08:38+5:302025-04-18T18:08:38+5:30
इस्लामपूर (जि. सांगली ) : अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष, जिल्हा परिषद ...

उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येवून तिसऱ्या मजल्यावरून पडले, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील नेते विजयसिंह महाडिक यांचा मृत्यू
इस्लामपूर (जि. सांगली) : अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक, मराठा आरक्षण समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष, जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे संस्थापक विजयसिंह निवृत्ती महाडिक (वय ६५) यांचे गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास अपघाती निधन झाले.
इस्लामपूर येथील त्यांच्या बंगल्याच्या छतावर गेल्यानंतर उन्हाच्या तीव्रतेने त्यांना चक्कर आल्याने तोल जाऊन ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. यात त्यांना गंभीर इजा झाली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी येलूर (ता. वाळवा) या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी १९९६ पासून त्यांनी महाराष्ट्रात चळवळ उभी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत वेळोवेळी बैठका घेऊन मराठा आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले.
२००५ साली सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. २००६ सालापासून मराठा आरक्षण चळवळ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र केली. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीत पानिपत येथे शौर्य दिन साजरा करून मराठ्यांची ताकद वाढवली. महाराष्ट्रातील ४२ संघटना एकत्रित करून त्यांनी मराठा आरक्षण समन्वय समिती स्थापन केली होती.