"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 12:52 IST2022-09-21T12:51:44+5:302022-09-21T12:52:30+5:30
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

"नेहरुंनी शांतीसाठी कबुतरं सोडली होती, मोदींनी ईडी, CBI नंतर चित्ता सोडायची भीती दाखवलीय!"
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांत काँग्रेस-शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्याबाबतचा प्रस्ताव दोन्ही पक्षांना दिला आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. त्यांनी सांगली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी शिवसेना व काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला असला तरी त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. कुणी बरोबर घेतले नाही, तरी आमची आघाडी या निवडणुका स्वबळावर लढेल. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतात तेव्हा त्याचा फायदा भाजपाला होता. दोघे वेगवेगळे लढले तर भाजपाला तोटा होत असल्याचे आतापर्यंतच्या निवडणुकीत पाहायला मिळालं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
प्रकाश आंबेडकरांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. सध्या देशाची वाटचाल राजेशाही, हुकुशाहीकडे सुरू आहे. पंडित नेहरुंनी शांततेसाठी कबुतरे सोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्ते सोडले. यापूर्वी सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या माध्यमातून भीती दाखवली. आता तर चित्ते सोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी ईडीच्या कारवाईवरुनही निशाणा साधला आहे. कोण दोषी, कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या, असं प्रकाश आंबेडकरांनी ईडीला सुनावलं. माझं ईडीला म्हणणं आहे की, तुम्हाला कुणाला पकडायचं असेल तर पकडा. पण २ महिन्यांत त्याचा एफआयआर कोर्टात गेला पाहिजे. कोर्टाला ठरवू द्या की तुम्ही केलेला तपास खरा आहे की खोटा. पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय चार-पाच महिने एखाद्याला तुरुंगात ठेवणं, याला घटना मान्यता देत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणाले.
सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला-
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता. एकनाथ शिंदे हे दुसरे उद्धव ठाकरे होते. पक्षात दुफळी निर्माण होणार नाही, नैराश्य येणार नाही, ही जबाबदारी त्यांच्यावर होती. परंतू तेच पक्षाच्या नेत्याविरोधात बंड करुन सरकारमधून बाहेर पडले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळू नये, अशी व्युहरचना श्रीमंत मराठ्यांची आहे.