सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:47 IST2025-03-25T12:47:27+5:302025-03-25T12:47:38+5:30
पलूस, मिरज, वाळवा तालुक्याच्या काही भागांत सरी

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
सांगली/कोल्हापूर : मेघगर्जना व ढगांच्या गडगडाटासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहर, म्हाकवे, गोरंबे, आणूर, बानगे, केनवडे व परिसरात पावसाने हजेरी लावली.
पलूस तालुक्यात भिलवडी, औदुंबर, अंकलखोप, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी येथे, वाळवा तालुक्यात आष्ट्यासह कारंदवाडी, मर्दवाडी, मिरजवाडी, नागाव, पोखरणी, ढवळी, फाळकेवाडी, बागणी या परिसरात तर मिरज तालुक्यातील समडोळी परिसरात पावसाने हजेरी लावली. आष्टा व परिसरात सोमवारी सायंकाळी विजेचा कडकडाट व वादळवाऱ्यासह पंधरा मिनिटे सरी कोसळल्या.
भिलवडी परिसरात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला. मात्र, काही ठिकाणी काढणी केलेल्या पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
शेतकऱ्यांची कसरत
समडोळी परिसरात पंधरा मिनिटे पाऊस पडल्याने काढणीस आलेला शाळू, हरभरा, गहू हाताला लागणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा पिकाची कापणी केली आहे, त्यांची या पावसाने तारांबळ उडाली.