Sangli: खटावमध्ये अज्ञाताने फिरवला द्राक्ष बागेत ट्रॅक्टर, सुमारे १२ लाखांचे नुकसान; पोलिसांकडून संशयिताचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:37 IST2026-02-13T13:37:35+5:302026-02-13T13:37:53+5:30
शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. बागायतदार शेतकऱ्याच्या वेदना

Sangli: खटावमध्ये अज्ञाताने फिरवला द्राक्ष बागेत ट्रॅक्टर, सुमारे १२ लाखांचे नुकसान; पोलिसांकडून संशयिताचा शोध
भिलवडी : खटाव (ता. पलूस) येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी विश्वजीत आनंदराव पाटील यांच्या द्राक्ष बागेत अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर फिरवून मोठे नुकसान केल्याची घटना ११ फेब्रुवारीच्या रात्री घडली. या घटनेत सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विश्वजीत पाटील यांच्या घराशेजारी सुमारे दोन एकर क्षेत्रावर द्राक्ष बाग असून सध्या बागेत चांगल्या प्रतीचे पीक आले होते. अवघ्या महिनाभरात ही द्राक्षे बाजारात जाण्याच्या तयारीत होती. मात्र अज्ञात व्यक्तीने पाटील यांच्या घराजवळ उभा असलेला ट्रॅक्टर घेऊन थेट द्राक्ष बागेत घुसवला व संपूर्ण बागेत फिरवून मोठे नुकसान केले.
या घटनेत अंदाजे साडेतीनशे ते चारशे द्राक्ष झाडांचे नुकसान झाले असून बागेतील लोखंडी अँगल, तारा तसेच ट्रॅक्टरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऐन हंगामात झालेल्या या प्रकारामुळे पाटील कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहिदास पावशे, हवालदार दीपक पाटील व शिपाई स्वप्निल शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. संशयित आरोपीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी फिर्यादी पाटील व परिसरातील शेतकऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, द्राक्षबागेचे नुकसान करण्याचा प्रकार पूर्ववैमनस्य, राजकीय सूडबुद्धी, चोरीचा प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आला काय? याचा शोध भिलवडी पोलिस घेत आहेत.
कठोर कारवाई करा
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. दोषी व्यक्तीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
काबाडकष्टातून उभारलेल्या द्राक्षबागेचे केलेले नुकसान हे दु:खदायक आहे. यामुळे माझे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीवर मारा; पण पोटावर मारू नका. - विश्वजीत आनंदराव पाटील, द्राक्ष बागायतदार