केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:05 IST2025-05-26T17:04:33+5:302025-05-26T17:05:05+5:30
माझ्या पक्षाची ताकद नरेंद्र मोदी यांनाच कळली

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे केले कौतुक
सांगली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा रविवारी सांगली दौरा होता. सांगलीत पत्रकार परिषदेत आठवले यांनी महायुतीवर थेट नाराजी व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे मात्र भरभरून कौतुक केले. आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत आहे. त्यामुळेच मला तीन वेळा मंत्रिमंडळात घेतले, असेही ते म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही पद मिळत नाही. राज्यात एक मंत्रिपद अथवा महामंडळ मिळायला हवे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेसाठी एकही जागा दिली नाही. आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला हवा होता. शरद पवार यांच्या काळात काँग्रेस आघाडीबरोबर असताना सहा ते सातजण विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. मंत्रीदेखील झाले. आघाडीच्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. पण, महायुतीच्या काळात आरपीआयला सत्तेत संधी मिळत नाही. याबद्दल माझे कार्यकर्ते खूपच नाराज आहेत.
आंबेडकरांनी ‘रिपब्लिकन’चे नेतृत्व करावे
रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष सुरू झाला. रिपब्लिकन पक्षामध्ये विविध गट आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्व गटांनी एकत्र यावे आणि त्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. यासाठी मंत्रिपद सोडावे लागले तरी चालेल, कारण समाजापेक्षा पद मोठे नाही. शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्व एकत्र येतील अशी शक्यता काही वाटत नाही. रिपब्लिकनचे गट एकत्र येऊ शकतात मी त्यासाठी प्रयत्नशील आहे.