सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:23 IST2024-12-20T18:21:49+5:302024-12-20T18:23:33+5:30

सांगली : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे कार्यान्वित झाला ...

Under the Chief Minister Solar Agriculture Vahini scheme, the first 4 MW project in Sangli district has been commissioned at Basargi | सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार

सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार

सांगली : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदूर व गुगवाड या गावांतील १,१०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.

कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वांत मोठ्या विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात ३४ ठिकाणी एकूण क्षमता २०७ मेगावॅटचे सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतिपथावर असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारीदेखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.

जागा देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्यासह प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी दिली.

सौर प्रकल्प ग्राहक हिताचे : स्वप्निल काटकर

वीज ग्राहक व शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे आहेत. यामुळे शेतीकरिता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांत विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या पर्यावरणपूरक विकासकामात आपला सहभाग नोंदवावा, तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले.

Web Title: Under the Chief Minister Solar Agriculture Vahini scheme, the first 4 MW project in Sangli district has been commissioned at Basargi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.