Sangli Crime: नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याचा केला निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:15 IST2025-03-05T13:14:46+5:302025-03-05T13:15:08+5:30
मामासह मामेभावालाही अटक : डोक्यात दगड, लोखंडी रॉडचा वर्मी घाव

Sangli Crime: नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याचा केला निर्घृण खून
कुपवाड : नात्यातील अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून राहुल अप्पासाहेब सूर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक, सध्या रा. कुपवाड) याचा मामा व मामेभावाने डोक्यात दगड घालून आणि लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. खुनामागे जमीन किंवा कौटुंबिक वादाचे दुसरे कारणही असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.
अटक केलेल्या संशयितांमध्ये संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (वय २२, दोघेही रा. प्रकाशनगर, गल्ली नं.३, कुपवाड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत राहुल सूर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई व भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी राहुल सूर्यवंशी हा कामानिमित्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत मजुरीचे काम करीत होता. मंगळवारी आठवड्याची सुटी असल्याने तो घरी एकटाच होता. राहुल सूर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होता. पीडितेने हा प्रकार नातेवाइकांना सांगितला होता. नातेवाइकांनी राहुलला वेळोवेळी समज दिली होती, तरीही तो ऐकत नव्हता.
मंगळवारी दुपारी राहुलने पीडित मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मामेभाऊ सौरभ सावंत व मामा संदीप सावंत याच्या निदर्शनास आला. यावेळी सौरभने रागाच्या भरात सूर्यवंशी याला पकडून मारहाण केली. यावेळी संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केला. संशयित सौरभने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहुलला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी संशयित सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतले.