रुग्णालयात जादूटोणाचा प्रकार: संजय गेळेस सांगलीत केली अटक, पत्नी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 19:11 IST2022-12-29T19:10:36+5:302022-12-29T19:11:03+5:30
रुग्णाच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले.

रुग्णालयात जादूटोणाचा प्रकार: संजय गेळेस सांगलीत केली अटक, पत्नी फरार
लक्ष्मण सरगर
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील बहुचर्चित बनलेल्या धर्मातर प्रकरण व रुग्णालयात जाऊन अतिदक्षता विभागातील एका रुग्णावर केलेल्या जादूटोणा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संजय गेळे याला काल, बुधवारी रात्री पोलिसांनीसांगली येथून अटक केली. गेळे यास न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ डिसेंबर पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्यासह शंकर पाटील, डी डी खोत, प्रमोद रोडे, नंदकुमार पवार, उमर फकीर यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
याबाबत माहिती अशी, संजय गेळे व त्याची पत्नी अश्विनी यांनी आपल्या अंगी दिव्य शक्ती असल्याचे भासवून जादूटोणा करून पेशंट बरा करण्याच्या उद्देशाने वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती दिली. तसेच आयसीयूमध्ये विनापरवानगी प्रवेश केला. रुग्ण सोनाली शिवदास जिरे हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवले. जादूटोणा, भोंदूगिरी केल्याची फिर्याद संपतराव नामदेव धनवडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आटपाडीमध्ये लोकभावना तीव्र होत विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदन देत भोंदूगिरी, अंधश्रध्दा पसरवत धर्मातराचे रॅकेट गेळे कुटुंब चालवत असून त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर बेकायदेशीररित्या अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या संजय गेळे याला अटक करण्यात आली आहे. मात्र त्याची पत्नी आश्विनी गेळे मात्र अद्याप फरार आहे.