लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:33 IST2025-08-26T14:32:47+5:302025-08-26T14:33:43+5:30
सतत टोलवाटोलवी

लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा
सांगली : लिलावात मोटार देतो सांगून सांगलीतील मेडिकल व्यावसायिक महावीर काशाप्पा आलासे (वय ५५, रा. शिंदे मळा) यांची १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित अनिल शिवराम कोंडा (रा. पद्मानगर, भिवंडी, ठाणे), गणेश सुरेश पाटील (रा. अरिहंत कॉलनी, सांगली) या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महावीर आलासे यांची एक वर्षापूर्वी गाड्यांची देवघेव करणाऱ्या गणेश पाटील याच्याशी ओळख झाली होती. आलासे यांनी त्यांच्या वापरासाठी मोटार घ्यायची आहे असे सांगितले होते. तेव्हा गणेश याने अथर्व मोटर्सचे मालक अनिल कोंडा यांच्याकडे लिलावात गाडी ठेवली आहे. आवडली तर ॲडव्हान्स रक्कम पाठव असे सांगितले. गाडीचे फोटो बघितल्यानंतर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये दोन लाख रुपये त्यानंतर २९ रोजी पाच लाख रुपये तर १० नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा पाच लाख रुपये असे १२ लाख रुपये कोंडा याच्या बँक खात्यावर पाठवले.
रक्कम पाठवल्यानंतर गणेश याने आलासे यांना भिवंडी येथे लिलावास जावे लागेल असे सांगितले. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०२० रोजी कोंडा याला कॉल केला. परंतु, त्याने वारंवार कॉल करूनही तो उचलला नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर कोंडा याने आलासे यांना, गणेश पाटील हा मोटार व पाच लाख रुपये घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे आलासे यांनी गणेशकडे पाठपुरावा केला.
त्याने आज-उद्या जाऊ असे म्हणत सतत टोलवाटोलवी केली. त्याच्या घराकडे जाऊन सतत विचारणा केल्यानंतर गणेशच्या पोलिस वडिलांनी देखील पुन्हा इकडे फिरकायचे नाही असे सांगितले. दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे आलासे यांनी कोंडा व गणेश याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.