खुनांच्या दोन घटनांमुळे सांगली जिल्हा हादरला; कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तर उमदीच्या तरुणाचा जतमध्ये खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:40 IST2025-12-20T12:38:09+5:302025-12-20T12:40:38+5:30
आचारसंहितेच्या काळातच खून झाल्याने खळबळ उडाली, काही तासातच मुख्य संशयित ताब्यात

खुनांच्या दोन घटनांमुळे सांगली जिल्हा हादरला; कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तर उमदीच्या तरुणाचा जतमध्ये खून
सांगली : दोन तरुणांच्या खुनाच्या घटनांनी शुक्रवारी जिल्हा हादरला. सांगली शहराजवळील कुपवाडमध्ये एका तरुणाचा भरदिवसा धारदार शस्त्राने, तर जतमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून करण्यात आला.
जत तालुक्यातील कारंडेवाडी येथील विकास मलकारी टकले (वय २५) याचा जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दगडाने ठेचून खून करण्यात आला. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, आरोपींची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
कुपवाडमध्ये राहुल सुनील कदम (वय २२, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड) या तरुणाचा भरदिवसा खून करण्यात आला. त्याच्या डोक्यात एडक्यासारख्या धारदार हत्याराने वार करण्यात आले. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याला मारण्यात आले. त्यानंतर मृतदेह संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अहिल्यानगरमध्ये आणून टाकण्यात आला.
निखिल अनिल यादव (वय २१, रा. चिंतामणीनगर, सांगली), रमेश मुकेश जाधव (वय १९, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड), विनायक उत्तम सूर्यवंशी (वय २३, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. खुनानंतर संशयित संजयनगर पोलिस ठाण्यात हजर झाले. खुनाचे कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पण संशयित हल्लेखोर आणि मृत तरुण हे मित्र होते, अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांनी दारूच्या नशेत कृत्य केले की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
सांगलीत सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शिवाय, जतमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. या दोन्ही शहरांत आचारसंहितेच्या काळातच खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
काही तासातच मुख्य संशयित ताब्यात
संजयनगर व कुपवाड पोलिसांनी तातडीने गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेऊन काही तासातच मुख्य संशयित विनायक सूर्यवंशी, निखिल यादव, रमेश जाधव या तिघांना जेरबंद केले. तर एका अल्पवयीन संस्थेत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी संशयिताकडे चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. संजयनगर पोलिसांनी तिघांना अटक करून पुढील तपासकामी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.