Sangli: बनावट आयकर अधिकारी टोळीतील दोघे शरण, अद्याप दोघे पसार; छापा टाकून केली होती कोट्यवधीची लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 11:46 IST2025-09-20T11:44:14+5:302025-09-20T11:46:09+5:30
जयसिंगपूरच्या मुख्य सूत्रधारासह दोघ फरार, पाच जणांची पोलिस कोठडीत रवानगी

Sangli: बनावट आयकर अधिकारी टोळीतील दोघे शरण, अद्याप दोघे पसार; छापा टाकून केली होती कोट्यवधीची लूट
सांगली : आयकर अधिकारी असल्याचा बनाव करून कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या टोळीतील अक्षय सुरेश लोहार (रा. बुगटे अलूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) आणि शकील गौस पटेल (रा. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) हे पोलिसांना शरण आले. टोळीतील तिघांना गुरुवारी अटक केली होती. त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अद्याप दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
कवठेमहांकाळ येथील डॉ. जगन्नाथ म्हेत्रे (रा. झुरेवाडी रस्ता) यांच्या निवासस्थानी दि. १४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास महिलेसह चौघांनी मुंबई येथील आयकर अधिकारी असल्याचे भासवून छापा मारल्याचा बनाव केला. झडतीमध्ये १४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १५ लाख ६० हजार रोकड घेऊन पलायन केले होते.
वाचा- छापा टाकायचा होता बेळगावला, पण खून झाल्याने टोळी पोहचली कवठेमहांकाळला; सांगलीतील बोगस छापेमारीच्या बातमीमागची बातमी
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने साठ तासांत कसून तपास करत टोळीचा पर्दाफाश केला. टोळीतील दीक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. काकडे पार्क, बिल्डिंग, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (२५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि साई दीपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, करवीर, कोल्हापूर) या तिघांना अटक केली.
त्यांच्याकडून १ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर अक्षय लोहार आणि शकील पटेल हे दोघे शुक्रवारी स्वत:हून शरण आले. टोळीचा सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे (मूळ रा. जयसिंगपूर, सध्या रा.घाटकोपर, मुंबई) आणि आदित्य मोरे (रा. रुकडी, ता.हातकणंगले) हे दोघे अद्याप पसार आहेत.