Sangli: मित्राचा हळदी कार्यक्रम करून परत येताना काळाचा घाला, डंपरच्या धडकेत दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 14:12 IST2024-01-01T14:10:30+5:302024-01-01T14:12:08+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील राजारामबापू कारखान्याच्या गाडी तळाजवळ थांबलेल्या माेटारीला भरधाव वेगात आलेल्या डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दोघे जागीच ...

Sangli: मित्राचा हळदी कार्यक्रम करून परत येताना काळाचा घाला, डंपरच्या धडकेत दोघे ठार
इस्लामपूर : इस्लामपूर-ताकारी रस्त्यावरील राजारामबापू कारखान्याच्या गाडी तळाजवळ थांबलेल्या माेटारीला भरधाव वेगात आलेल्या डंपरने पाठीमागून धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले. या धडकेत माेटार १५ फूट फरफटत गेली. माेटारीतील दोघांच्याही अंगावरून डंपरचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. मित्राच्या हळदीचा कार्यक्रम करून परतत असताना ही घटना घडली. मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
प्रांजल अभिनेश तिवारी (रा. नऱ्हे-पुणे) आणि किशोर नंदकुमार गेजगे (रा. सुभाषनगर, मिरज) अशी मृतांची नावे आहेत. या दोघांचे मित्र दीपक द्विवेदी, आनंद आर्यन आणि निरंजन कोकाटे यांच्या डोळ्यांसमोर या दोन मित्रांचा करुण अंत झाला. या अपघातात माेटारीचे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी दीपक कुमार द्विवेदी (मूळ रा. रिवा-मध्य प्रदेश, सध्या-सिंहगड कॉलेज, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपरचालकाविरुद्ध अपघात करून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. अपघातानंतर डंपरचालकाने वाहनासह पलायन केले.
प्रांजल व किशाेरसह त्यांचे मित्र इस्लामपूरमधील प्रतीकाज बुचडे या मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. हे सर्वजण इस्लामपूरमधील मित्राची माेटार (एमएच ४७ डब्ल्यू ६२८०) घेऊन शनिवारी पलूस येथे गेले. रात्री उशिरापर्यंत हळदीचा कार्यक्रम करून सर्वजण मध्यरात्रीनंतर इस्लामपूरकडे येत होते. रात्री दोनच्या सुमारास राजारामबापू कारखाना परिसरातील गाडी तळाजवळ लघुशंकेसाठी त्यांनी माेटार थांबविली. पार्किंग लाईट लावून अगोदर प्रांजल आणि किशोर हे दोघे जाऊन आले व माेटारीच्या पाठीमागे थांबले.
त्यानंतर दीपक आणि इतर दोघे माेटारीपासून बाजूला गेले. याचवेळी ताकारीकडून इस्लामपूरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या डंपरने माेटारीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये प्रांजल आणि किशोर हे दोघेही माेटारीसह फरफटत गेले. यातच अंगावरून डंपरची चाके गेल्याने दोघांचाही जागीच मृत्यु झाला. त्यानंतर डंपरचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. हवालदार उदय पाटील अधिक तपास करत आहेत.