Sangli: ईश्वरपूर येथील बलात्कार प्रकरणातील दोघांना पोलिस कोठडी, पीडितेला विवस्त्र अवस्थेत करावी लागली होती पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:00 IST2025-12-19T16:59:18+5:302025-12-19T17:00:00+5:30
अत्याचार करुन पीडित मुलीचे कपडे घेत दोघांनी पलायन केले होते.

Sangli: ईश्वरपूर येथील बलात्कार प्रकरणातील दोघांना पोलिस कोठडी, पीडितेला विवस्त्र अवस्थेत करावी लागली होती पायपीट
ईश्वरपूर : असाहाय्य कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेतील दोघा संशयितांना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवारी रात्री ही घटना घडल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी या दोघा संशयितांना अटक केली होती.
सराईत गुंड ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (दोघे रा. ईश्वरपूर), अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी (दि.१६) रात्री पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण करत वाळवा रस्त्यावरील एका निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर दोघांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीचे कपडे घेत दोघांनी पलायन केले होते. त्यामुळे पीडित मुलीला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंतची पायपीट करावी लागली होती. याबाबत तिच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. संशयितांनी पीडित मुलीच्या अंगावरील घेतलेले कपडे व मारहाण करण्यासाठी वापरलेला बेल्ट हस्तगत करावयाचा आहे. या दोघांचे डीएनए चाचणी आवश्यक आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि दोघांना गुन्हा करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याचा तपास करावयाचा आहे.
साक्षीदार निष्पन्न करतानाच मुख्य संशयित ऋतिक महापुरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने कसून चौकशी करणे गरजेचे असल्याने ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी मंजूर करत दोघांची २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.