Accident in Sangli: टाकळीत दोन मोटारींचा भीषण अपघात, 'एअर बॅग'मुळे सहाजणांचे जीव वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 17:56 IST2022-05-21T17:24:55+5:302022-05-21T17:56:00+5:30
अपघातस्थळी रस्त्याकडेला असलेल्या पानपट्टीत मोटार घुसल्याने पानपट्टीचा चुराडा झाला. काही सेकंदच अगोदर पानपट्टीचालक बाहेर गेला होता. पानटपरीचे मोठे नुकसान झाले तरी नशीब बलवत्तर असल्याने पानपट्टी चालक बचावला.

Accident in Sangli: टाकळीत दोन मोटारींचा भीषण अपघात, 'एअर बॅग'मुळे सहाजणांचे जीव वाचले
मिरज- टाकळी : मिरज-सलगरे मार्गावरील टाकळी चौकात शुक्रवारी दुपारी दोन वाजता दोन मोटारींच्या भीषण अपघातात चालकासह तिघे जखमी झाले. दोन्ही मोटारीतील एअर बॅग ऐनवेळी उघडल्याने सहा जणांचे प्राण वाचले. जखमी तिघांना मिरजेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिरजेतून टाकळी मार्गे (एमएच-११-सीक्यु-९७७०) ही मोटार तासगावकडे जात होती. याचवेळी म्हैसाळच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी (एमएच-१२-केवाय-५८११) या मोटारीने टाकळी चौकात तासगावकडे जाणाऱ्या मोटारीला जोरदार ठोकर दिली. त्यामुळे तासगावकडे जाणारी मोटार रस्त्याकडेच्या पानटपरीत घुसली. अपघातात दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले. दोन्ही मोटारीतील एअरबॅग ऐनवेळी उघडल्याने सहा जणांचा जीव वाचला.
एका मोटारीतील दोन वृद्धांसह चालक किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली .
पानपट्टी चालकाचे नशीब बलवत्तर
अपघातस्थळी रस्त्याकडेला असलेल्या पानपट्टीत मोटार घुसल्याने पानपट्टीचा चुराडा झाला. काही सेकंदच अगोदर पानपट्टीचालक बाहेर गेला होता. पानटपरीचे मोठे नुकसान झाले तरी नशीब बलवत्तर असल्याने पानपट्टी चालक बचावला. यापूर्वीही याच चौकात अशाच पद्धतीने अपघात झाले आहेत.