Sangli: मिरजेत गावठी पिस्टलसह दोघांना अटक, जिवंत काडतुसासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:50 IST2025-12-18T18:49:42+5:302025-12-18T18:50:01+5:30
आरोपी दस्तगीर शौकत बावा याच्यावर यापूर्वीही इसापुरे गल्लीत हवेत गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल

Sangli: मिरजेत गावठी पिस्टलसह दोघांना अटक, जिवंत काडतुसासह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
मिरज : मिरज शहर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे व चारचाकी वाहनासह सुमारे १० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
दस्तगीर शौकत बावा (वय ३७, रा. इसापूर गल्ली, मिरज) व अझल मोहम्मद मदार सय्यद (वय ३२, रा. इसापूर गल्ली, मिरज) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाला दि. १७ डिसेंबर रोजी रात्री २ वाजता मिरजेत गांधी चौकात नाकाबंदीदरम्यान तपासणीत चारचाकी वाहनात एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळली. आरोपी दस्तगीर शौकत बावा याच्यावर यापूर्वीही इसापुरे गल्लीत हवेत गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
गोळीबार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसात बावा व सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. बावा याने गावठी पिस्टल कोणाकडून आणले याचा तपास शहर पोलीस करीत आहेत.