विट्यात पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST2021-04-11T04:26:17+5:302021-04-11T04:26:17+5:30

कोरोना संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. शुक्रवारी विटा पोलीस ...

Two arrested | विट्यात पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

विट्यात पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

कोरोना संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. शुक्रवारी विटा पोलीस ठाण्याचे हवालदार नंदकुमार मदने व आणखी एक पोलीस कर्मचारी मायणी रस्त्यावरील एका औषध दुकानाजवळ थांबले होते. त्यावेळी शिवाजी चौकातून मायणी रस्त्याकडे मास्क न लावता दुचाकीवरून जाणाऱ्या शुभम भागवत व प्रतीक बिसुरकर या दोन तरुणांना मदने यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी शिवम हा गाडी चालवित होता. त्याने हवालदार मदने यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुचाकीचा वेग कमी झाल्यानंतर पाठीमागे बसलेल्या प्रतीक याने मदने यांचा हात पकडून त्यांना गाडीसोबत पेट्रोल पंपापर्यंत फरफटत नेले. मात्र, पुढे वाहतुकीची गर्दी असल्याने प्रतीकने हवालदार मदने यांचा हात सोडून दिला. या घटनेत मदने यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर विटा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान, कर्तव्य बजावत असताना शासकीय कामात अडथळा आणून पोलीस हवालदार मदने यांना दुचाकीसोबत फरफटत नेऊन जखमी केल्याप्रकरणी संशयित शुभम भागवत व त्याचा साथीदार प्रतीक बिसुरकर या दोघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या दोन संशयितांना शनिवारी सांगली येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष डोके पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two arrested