हिंदुस्थान टिकवण्यासाठी शत्रूला संपविणे आवश्यक - संभाजी भिडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:50 IST2025-10-04T16:50:00+5:302025-10-04T16:50:23+5:30
दुर्गामाता दौडची उत्साहात सांगता

हिंदुस्थान टिकवण्यासाठी शत्रूला संपविणे आवश्यक - संभाजी भिडे
सांगली : हिंदुस्थान टिकवायचा असेल तर आपल्या शत्रूला संपवले पाहिजे. पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही. असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केले.
‘जय भवानी-जय शिवाजी’च्या प्रचंड जयघोषात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडची विजयादशमी दिवशी मोठ्या उत्साहात सांगता झाली. शहरातील विविध भागात शेवटच्या दिवशी दौडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दुर्गामाता दौडीच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी पहाटे मारुती चौकातील शिवतीर्थावर हजारो कार्यकर्ते जमले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन, ध्वजपूजन करून दौडीस प्रारंभ झाला. दौडीच्या अग्रभागी भव्य भगवा ध्वज फडकत होता. त्याामागे शस्त्रधारी पथक, भगवे फेटे, टोपी धारण केलेले हजारो कार्यकर्ते 'जय भवानी-जय शिवाजी’चा जयघोष करत सहभागी झाले होते.
दौड राजवाडा चौक, वखारभाग, कॉलेज कॉर्नरमार्गे माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिराजवळ आली. पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले हजारो कार्यकर्ते यामुळे वातावरण भगवेमय बनले होते. दुर्गामाता मंदिराजवळ आरती झाली. प्रेरणामंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला.