कडक उन्हातही वन्यप्राण्यांची तहान भागणार, सांगलीतील सागरेश्वर अभयारण्यात ३२ पाणवठ्यांची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 20:02 IST2026-03-25T20:02:12+5:302026-03-25T20:02:32+5:30
सध्या तापमान ३७ ते ३९ अंशांवर पोहोचले

कडक उन्हातही वन्यप्राण्यांची तहान भागणार, सांगलीतील सागरेश्वर अभयारण्यात ३२ पाणवठ्यांची निर्मिती
नितीन पाटील
पलूस : सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सागरेश्वर अभयारण्याच्या वनक्षेत्रात वन्यजीव, प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्यांची उभारणी करण्यात आली आहे. पलूस तालुका आणि सागरेश्वर परिसरात सध्या उन्हाळ्याची कडाक्याची दाहकता वाढली आहे. सध्या तापमान ३७ ते ३९ अंशांवर पोहोचले आहे. अशा पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी सागरेश्वर अभयारण्याच्या प्रशासनाने परिसरात सुमारे ३२ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. त्यात नियमितपणे पाणी सोडले जात असल्याने कडक उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे.
दिवसेंदिवस उन्हाळ्याची दाहकता आणि तापमान वाढत चालले आहे, तशी अभयारण्य आणि वनक्षेत्र परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून १०.३ किलोमीटर क्षेत्रात तब्बल ३२ कृत्रिम पाणवठे उभारण्यात आले आहेत. या पाणवठ्यांवर काही ठिकाणी पाइपलाइनद्वारे तर अनेक ठिकाणी टँकरद्वारे वन्यजीवांना मुबलक पाणी पुरवले जात आहे.
या उपक्रमामुळे या परिसरातील हरण, काळवीट, तरस, बिबटे, गवे, ससे, माकडे तसेच इतर लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील तीन महिन्यांपासून नियमित पाणवठ्यात पाणीपुरवठा केला जात आहे. संवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण, प्राणी आणि पक्ष्यांचे संगोपन आणि त्यांची सुरक्षा हेच आमचे काम आणि कर्तव्य आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे वनसंपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत. - बालाजी चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सागरेश्वर अभयारण्य