Sangli: कंपनीतील मैला टाकी स्वछ करण्यासाठी गेलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू, पाचजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:01 IST2025-12-29T12:00:04+5:302025-12-29T12:01:09+5:30
टाकीतील कार्बनडाय ऑक्साइड या वायूचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने तिघे श्वास गुदमरून जागीच ठार झाले

संग्रहित छाया
ईश्वरपूर : पुणे-बंगरुळू आशियाई आंतरराष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा ते पेठनाका या दरम्यान असलेल्या बॉम्बे रेयॉन या कंपनीतील मैला टाकी स्वच्छ करण्याच्या कामासाठी गेलेल्या तीन कामगारांचा टाकीत पडून गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याचवेळी अन्य पाच कामगारसुद्धा श्वास कोंडून गुदमरले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. चौघांवर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात येऊन पोलिसांनी या रुग्णांचे जबाब नोंदवून घेतले.
विशाल सुभाष जाधव (३५), सचिन तानाजी जाधव (३९, दोघे रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (३३, रा. गोळेवाडी-पेठ) अशी तिघा मृतांची नावे आहेत; तर महादेव रामचंद्र कदम (४६) याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. सुनील आनंदा पवार (२९, रा. रेठरेधरण), केशव आनंदा साळुंखे (४५, रा. निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (२७, रा. ओझर्डे) आणि विशाल मारुती चौगुले (२९, रा. ईश्वरपूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बॉम्बे रेयॉन कंपनीतील हे कामगार रविवारी सायंकाळी मैला टाकी स्वच्छ करण्याच्या कामासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. टाकीतील कार्बनडाय ऑक्साइड या वायूचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने तिघे श्वास गुदमरून जागीच ठार झाले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करत असलेले बाकीचे पाचजण श्वास कोंडल्याने अत्यवस्थ झाले होते. या सर्वांना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांनी जखमींची माहिती घेत कर्मचाऱ्यांना जबाब नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.