मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तीन हजार शाळांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 16:02 IST2025-10-29T16:01:39+5:302025-10-29T16:02:05+5:30
जिल्ह्याला पहिले बक्षीस ५१ लाखांचे, २०० गुणांची होणार पाहणी

मुख्यमंत्री ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तीन हजार शाळांचा सहभाग
सांगली : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये सुमारे तीन हजार शाळा सहभागी होणार आहेत. या टप्प्यातही जिल्ह्यातील शाळा चांगली बक्षिसे मिळवतील, असा विश्वास शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केला.
३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. विजेत्या शाळांना लाखो रुपयांची बक्षिसे शासनातर्फे दिली जाणार आहेत. या अभियानासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, अशी विभागणी करण्यात आली आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा इत्यादी घटकांविषयी जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. अभियानाचा कालावधी संपल्यानंतर १ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत शाळांचे मूल्यांकन केले जाईल. त्यानंतर अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ होईल.
अभियानात सहभागी शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३८ गुण आहेत. शासनाच्या ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी १०१ गुण, शैक्षणिक संपादनुकीसाठी ६१ गुण, असे एकूण २०० गुण दिले जातील. या निकषांच्या आधारे मूल्यांकन करून गुण दिले जाणार आहेत. तालुका स्तरावरील मूल्यांकनासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती असेल. जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती मूल्यांकन करेल.
विजेत्या शाळांना लाखो रुपयांची बक्षिसे
जिल्हास्तरावरील विजेत्या शाळांना ११ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक पाच लाख रुपये, तृतीय पारितोषिक तीन लाख रुपये असेल. महापालिका स्तरावर प्रथम पारितोषिक २१ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक १५ लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक ११ लाख रुपये असेल. तालुकास्तरावर प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये, द्वितीय दोन लाख रुपये, तृतीय एक लाख रुपये आहे. विभागस्तरावर २१ लाख, १५ लाख व ११ लाखांची बक्षिसे आहेत. राज्यस्तरावर ५१ लाख व ३१ लाख रुपये बक्षीस आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी अभियानात भाग घ्यायचा आहे. शासनाच्या निकषांनुसार कामगिरी करीत या टप्प्यातही जिल्ह्यातील शाळा बक्षिसे मिळवतील, असा विश्वास आहे. - मोहन गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी