विजयनगरला तीन लाखाचे पीक संजीवक सील

By Admin | Updated: August 26, 2015 23:04 IST2015-08-26T23:04:11+5:302015-08-26T23:04:11+5:30

कंपनीवर छापा : कृषी विभागाची कारवाई

Three lacquer peak cottage sealed in Vijaynagar | विजयनगरला तीन लाखाचे पीक संजीवक सील

विजयनगरला तीन लाखाचे पीक संजीवक सील

सांगली : विजयनगर-म्हैसाळ (ता. मिरज) येथे विनापरवाना पीक संजीवक तयार करणाऱ्या ‘ब्लॅकवॉर्मस’ कंपनीवर बुधवारी छापा टाकून तेथील २ लाख ८९ हजार १०० रुपयांचा पीक संजीवकाचा साठा सील करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ही कारवाई केली. नमुने प्रयोगशाळेकडे पाठविले असून, त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई होणार आहे. अधिकाऱ्यांनी सकाळी छापा टाकल्यानंतर औषध दुकानांच्या तपासणीकडे दुर्लक्ष केले. या कारवाईबाबत साशंकता आहे.
म्हैसाळजवळील विजयनगर येथे विनापरवाना शेतीची औषधे तयार केली असल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे आली. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मिरज पंचायत समितीचे कृषी अधिकारी अण्णासाहेब बारवकर यांनी विजयनगर येथील बाळासाहेब शिंदे, श्रीधर शिंदे यांच्या ‘ब्लॅकवॉर्मस’ कंपनीवर छापा टाकला. या कंपनीच्या २ लाख ८९ हजार १०० रुपये किमतीच्या उत्पादनास विक्री बंदचे आदेश दिले. शिंदे यांनी पीक संजीवक उत्पादनासाठी शासनाकडून परवाना घेतलेला नाही. याशिवाय, कंपनीमध्ये साठा रजिस्टर नोंदवही सापडली नाही. यामुळे कंपनीमधून किती औषधांचा बाहेर पुरवठा झाला, हे कळाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पादकाने जेवढे उत्पादन केले, ते सर्व बाजारपेठेत पाठविल्याचे त्यांनी सांगितले. तेथे उपलब्ध पीक संजीवकाचे नमुने घेतले असून, ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. अहवालामध्ये पीक संजीवकाशिवाय अन्य घटक आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


पॅकिंगवर दोन पत्ते
येथील ‘ब्लॅकवॉर्मस’ या पीक संजीवकाच्या एक लिटरच्या बाटलीवर विजयनगर येथे उत्पादन घेतले जात असल्याचे लेबल आहे, तर दुसऱ्या बाटलीवर हे उत्पादन नाशिक येथे घेतले जात असल्याचा पत्ता आहे. या दोन पत्त्यांबाबत तपास करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

Web Title: Three lacquer peak cottage sealed in Vijaynagar