पूरग्रस्तांच्या मदत वाटपात गोंधळ, मिरज तहसीलमधील अव्वल कारकुनासह तीन लिपिक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:23 IST2022-02-10T19:19:06+5:302022-02-10T19:23:10+5:30
पूरग्रस्तांच्या मदत वाटपातील गोंधळाला जबाबदार धरत करण्यात आली कारवाई

पूरग्रस्तांच्या मदत वाटपात गोंधळ, मिरज तहसीलमधील अव्वल कारकुनासह तीन लिपिक निलंबित
मिरज : महापूर मदत वाटपात गोंधळाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व तीन लिपिक अशा चाैघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. २०१९ मधील महापुराने बाधित अनेक नागरिक व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारीबाबत ही कारवाई करण्यात आली.
मदत वाटप करताना लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक चुकल्याने शेकडो पूरग्रस्तांना बँक खात्यावर शासनाची मदत जमा झाली नाही.
शासनाच्या मदत वाटपाची जबाबदारी तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून राम टिकारे, लिपिक अभिजित गायकवाड, चेतन जाधव, शुभम कांबळे यांच्यावर होती. कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.
जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी यांनी तक्रारींची पडताळणी करून मदत वाटपातील गोंधळाला जबाबदार ठरवत चाैघांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.