सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, येत्या शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी
By अशोक डोंबाळे | Updated: April 4, 2023 18:20 IST2023-04-04T18:20:09+5:302023-04-04T18:20:38+5:30
राज्य शासनाचा पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय

सांगली जिल्ह्यातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, येत्या शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी
सांगली : जिल्हा परिषद, महापालिका शाळांतील पहिली ते आठवीच्या तीन लाख ४५ हजार १४२ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात गणवेश देण्यात येणार आहे. बालवयात मुलांच्या मनात एकमेकांबद्दल जातीय भेदभाव निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने तसा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ४५ हजार १४२ विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात मोफत गणवेश मिळणार आहेत. राज्य शासनाकडून प्रतिविद्यार्थी गणवेश ६०० रुपयांप्रमाणे अंदाजे २० कोटी ७० लाखाचा निधी मिळणार आहे. तो संबंधित शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग केला जाणार आहे. नेहमी गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून शाळा व्यवस्थापन समिती गणवेश शिलाई करून घेते आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलांना त्याचे वाटप होते.
आता शिलाई काम करणाऱ्यांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. ठराविक मुलांनाच मोफत गणवेश मिळत असल्याने शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात जातीसंदर्भात भेदभावाची भावना निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच मुलांना गणवेश देण्याची मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व मुलांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहे विद्यार्थीसंख्या
पहिली ३९५२६
दुसरी ४२६२७
तिसरी ४३६५८
चौथी ४३६१५
पाचवी ४४४८३
सहावी ४३५३६
सातवी ४३६०२
आठवी ४४०९५
एकूण ३४५१४२
राज्य शासनाने पहिली ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून त्यावर कार्यवाही केली जात आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर कार्यवाही होणार आहे. -मोहन गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक