Sangli: प्रेमसंबंधासाठी त्रास देऊन बदनामीची धमकी; विवाहितेची आत्महत्या, चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:35 IST2025-11-27T15:33:42+5:302025-11-27T15:35:43+5:30
तेव्हा मृत विवाहितेच्या आईने त्याला खडसावले होते.

Sangli: प्रेमसंबंधासाठी त्रास देऊन बदनामीची धमकी; विवाहितेची आत्महत्या, चुलत दिराविरुद्ध गुन्हा दाखल
सांगली : प्रेमसंबंध ठेवण्यासाठी सतत त्रास देऊन बदनामीची धमकी देत पूजा राहुल देसाई (वय २४) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चुलत दीर अभिषेक उत्तम देसाई (रा. मार्डी, ता. माण, जि. सातारा) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृत पूजा यांची आई छाया मुगटराव ननावरे (रा. खुटबाव, ता. माण) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा आणि राहुल अशोक देसाई यांचा विवाह २०१९ मध्ये झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. विवाहानंतर पूजा ही सासरी मार्डी येथे राहण्यास होती. २०२१ मध्ये तिचा चुलत दीर अभिषेक याने पूजा हिचा हात पकडला होता. तिने आईला हा प्रकार सांगताच त्यांनी अभिषेकला जाब विचारला. तेव्हा त्याने ‘मला पूजाशी लग्न करायचे होते’ असे सांगितले. तेव्हा पूजाच्या आईने त्याला खडसावले होते.
त्यानंतर पूजाचे पती राहुल यांची सांगलीला बदली झाल्यामुळे ते विश्रामबाग येथे राहण्यास आले. तरीही अभिषेक हा वारंवार पूजाला फोन करून त्रास देत होता. मला तुझ्याशी लग्न करायचे होते. तू माझ्याशी फोनवर बोलली नाहीस तर तुझ्या पतीला सांगून बदनामी करेन अशी धमकी देत होता.
दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी पूजाने पुन्हा एकदा आईला दीर अभिषेक हा कॉल करून त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारानंतर धक्का बसल्यामुळे पूजाच्या आईने तब्येत ठिक नसल्यामुळे तत्काळ तक्रार दिली नाही. तब्येत ठिक झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार मृत पूजाचा चुलत दीर अभिषेक देसाई याच्याविरूद्ध पूजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.