Sangli: बेदाण्याची चोरटी आयात.. उत्पादकांचा पाय खोलात; यंदाच्या हंगामात उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:35 IST2025-08-06T14:33:51+5:302025-08-06T14:35:16+5:30

यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड केले. मात्र..

This year's grape season production reduced due to unpredictable weather Growers hit by illegal Chinese imports | Sangli: बेदाण्याची चोरटी आयात.. उत्पादकांचा पाय खोलात; यंदाच्या हंगामात उत्पादनात घट

Sangli: बेदाण्याची चोरटी आयात.. उत्पादकांचा पाय खोलात; यंदाच्या हंगामात उत्पादनात घट

दत्ता पाटील

तासगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल ९१ हजार टन बेदाणा उत्पादन घटले. त्यामुळे यंदा बेदाणा दराने उच्चांकी रेकॉर्ड निर्माण केले. मात्र, उच्चांकी दराला बेकायदा चिनी आयातीचा फटका बसला. उत्पादन घटले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या दराचे गणित मात्र विस्कटलेले आहे. अपेक्षेपेक्षा प्रति किलोला शंभर ते दीडशे रुपयांची घसरण झाली.

केंद्र आणि राज्य शासनाकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे. बेदाणा उत्पादनात यंदा सरासरीपेक्षा मोठी घट झाली. नवीन बेदाण्याची आयात झाल्यानंतर, बाजारात यंदा बेदाणा दराने इतिहास निर्माण केला. उच्चांकी प्रति किलोला ८८८ रुपये इतका दर मिळवला. बेदाण्याला प्रति किलोस सरासरी ४०० ते ६०० रुपयापर्यंत दर मिळू लागला. मात्र, जून अखेरीस चीनमधून चोरट्या मार्गाने बेदाण्याची आयात सुरू झाली. कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा बाजारात सहजपणे उपलब्ध होऊ लागला. परिणामी बेदाण्याचा सरासरी दर ३०० ते ४०० रुपयांवर येऊन ठेपला.

उत्पादन कमी असताना देखील शेतकऱ्यांना प्रति किलोला दीडशे ते दोनशे रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी द्राक्ष उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. शासनाची उदासीन भूमिका द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांच्या मुळावर येऊन ठेपली आहे.

५२ हजार टन शिल्लक बेदाणा

तासगाव, सांगली, पंढरपूर, सोलापूर, पिंपळगाव, विजापूर या ठिकाणी एकूण १५४ कोल्ड स्टोअरेज आहेत. या कोल्ड स्टोअरेजची एकूण साठवणूक क्षमता २ लाख ९३ हजार ९० टन इतकी आहे. गेल्या वर्षी जुलै अखेर तब्बल एक लाख टन बेदाणा शिल्लक होता. यंदा जुलै अखेर केवळ ५२ हजार टन बेदाणा शिल्लक आहे.

उत्पादनात ९१ हजार टनांची घट 

  • २०२४-२५ या वर्षात राज्यात २ लाख ४६ हजार ६०० टन इतके बेदाण्याचे उत्पन्न झाले होते. तर, २०२५-२६ मध्ये १ लाख ५४ हजार ८७० टन इतके उत्पन्न उत्पादन झाले.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ९१ हजार ७३० टनाची घट झाली आहे.


चिनी बेदाणा सहज बाजारात

पंतप्रधानांनी स्वदेशीचा नारा दिला असला, तरी आयातदाराकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे. चोरट्या मार्गाने कर चुकवेगिरी करून चिनी बेदाणा राजरोसपणे भारतात आयात होत आहे. याबाबत कारवाईची मागणी करून देखील केंद्राने राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. चोरटी आयात थांबवून बेस रेटनुसार आयात कर लागू करावा, अशी आमची मागणी आहे. चोरट्या आयातीला वेळीच लगाम घातला नाही, तर दोन हजार कोटींचे परकीय चलन मिळवून देणारी आणि सुमारे ६० लाख लोकांना रोजगार देणारी द्राक्ष इंडस्ट्री संपुष्टात येण्याचा धोका आहे. अशी माहिती राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिली.

आयात कर चुकवून भारतात बेदाणा आयात होत आहे. नेपाळ मार्गे चोरट्या पद्धतीने आयात होत आहे. त्याला केंद्र शासनाने तत्काळ लगाम घालावा. आयात होणाऱ्या बेदाण्याचा उत्पादनावर आधारित बेस रेट निश्चित करून कर आकारणी करावी, अन्यथा द्राक्ष बागायतदारांना भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होणार आहे. - सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी.

Web Title: This year's grape season production reduced due to unpredictable weather Growers hit by illegal Chinese imports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.