सांगली : येथील मार्केट यार्डातील ड्रायफ्रूट्सचे दुकान फोडून चोरट्यांनी आतील २ लाख ६३ हजार ८०० रुपयांचे काजू आणि बदाम यासह रोख ६ हजार रूपये लंपास केले. याबाबत फैसल फारुक सुतारिया (रा. सुंदरनगर, प्लॉट क्रमांक ६२, आनंद हाऊसिंगजवळ, मिरज ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी फैसल सुतारिया यांचे मार्केट यार्डातील गल्ली नंबर एक, प्लॉट नंबर ३३२ मध्ये सुलतान ट्रेडर्स मसाले आणि ड्रायफ्रूट्स हे दुकान आहे. दि. २० रोजी ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन रात्री ९.३० च्या सुमारास घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर कटावणीने उचकटून आतमध्ये प्रवेश केला. आतील ७० हजार २०० रुपयांच्या काजूच्या १० किलोच्या ९ पिशव्या घेतल्या. तसेच १ लाख ९३ हजार ६०० रुपयांच्या बदामाच्या २५ किलोच्या ११ पिशव्या घेतल्या. काऊंटरमधील रोख ६ हजार रुपयेही चोरले. चोरट्यांनी काजू, बदाम व रोकड असा २ लाख ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.मंगळवार, दि. २१ रोजी सकाळच्या सुमारास दुकानात चोरी झाल्याचे फिर्यादी सुतारिया यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तिघा चोरट्यांचा सहभागमार्केट यार्डातील दुकानातील चोरीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तिघा चोरट्यांनी ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुरक्षा यंत्रणा कुचकामीमार्केट यार्डाच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त केली आहे. परंतु, त्यांच्याकडून गस्त घातली जात नसल्यामुळे अधून-मधून चोऱ्या होत आहेत. चोरट्यांनी २५ किलो आणि दहा किलोच्या पिशव्या चोरल्या आहेत. गाडीतून हा माल चोरून नेईपर्यंत सुरक्षा रक्षक काय करत होते? असा सवाल व्यापारी विचारत आहेत.