मिनी मंत्रालयासाठी सांगलीत प्रशासनाची तयारी सुरु; मतदार केंद्रे, कंट्रोल-बॅलेट युनिट किती लागणार.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:49 IST2025-10-18T18:49:07+5:302025-10-18T18:49:49+5:30
आयोगाकडे नोंदविली मागणी

मिनी मंत्रालयासाठी सांगलीत प्रशासनाची तयारी सुरु; मतदार केंद्रे, कंट्रोल-बॅलेट युनिट किती लागणार.. वाचा
सांगली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. आयोगाने यावेळी १००० ते ११०० मतदार प्रत्येक केंद्राला जोडले आहेत. यावेळच्या निवडणुकीसाठी दोन हजार २२३ मतदार केंद्रे राहणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाद्वारा आवश्यक सुविधेसाठी तयारी सुरू आहे. तसेच मतदानासाठी कंट्रोल युनिट दोन हजार ४४५ आणि बॅलेट युनिट चार हजार ८९० लागणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मागणी केली आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे. साधारणतः दिवाळीनंतर या निवडणुका होण्याची शक्यता आहे. कारण, जिल्हा परिषद अध्यक्ष, गट आणि पंचायत समिती सभापती, गणांची आरक्षण सोडत झाली आहे. मतदान केंद्रांची निश्चित झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदानासाठी कंट्रोल युनिट प्रत्येक केंद्रासाठी एक, असे दोन हजार २२३ लागणार आहेत. १० टक्के जादा मागविण्यात येणार आहेत. असे एकूण दोन हजार ४४५ कंट्रोल युनिट लागणार आहेत. काही कंट्रोल युनिट आहेत. पण तेवढी संख्या पुरेशी नसल्यामुळे आयोगाकडे मागणी केली आहे.
तसेच बॅलेट युनिट चार हजार ८९० मागणी केली आहे. त्यानुसार आयोगाकडे मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने हैदराबाद येथून आपल्या जिल्ह्यासाठी कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट मिळणार आहेत. येत्या आठवड्यात ही मतदान यंत्रे येणार असून, त्यानंतर या सर्व यंत्रांची सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर तपासणी करून ही प्रत्येक तालुक्याला पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे यांनी दिली.
काय आहेत निर्देश?
मतदान केंद्रावर मतदारांच्या कमाल संख्येची मर्यादा आयोगाने घातली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद गटासाठी एका केंद्रावर १००० ते ११०० मतदार संख्या जोडण्यात आली. यापूर्वी मतदान केंद्रावर ८०० ते १००० मतदार संख्या जोडली होती.
आयोगाकडे नोंदविली मागणी
जिल्ह्यात दोन हजार २२३ केंद्रांसाठी दोन हजार ४४५ कंट्रोल युनिट, चार हजार ८९० बॅलेट युनिट आवश्यक आहेत. १० टक्के प्रमाणे सीयू आणि अडीच टक्क्यांप्रमाणे बीयूची मागणी नोंदविण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रशासनाने आवश्यक युनिटची मागणी आयोगाकडे नोंदविली आहे.
निवडणुका कधीही लागल्या तरी प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रे निश्चित झाली असून, मतदान यंत्रेही तपासून तयार आहेत. काही यंत्रे कमी पडणार आहेत, ती मागणी आयोगाकडे केली आहे. आठवडाभरात सर्व मतदान यंत्रे येणार असून, त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. - राजू शिंदे, उपजिल्हाधिकारी