..तर गाठ माझ्याशी असेल!, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 17:29 IST2023-01-21T17:28:48+5:302023-01-21T17:29:27+5:30

आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय, अजितदादा महाराष्ट्रासाठी दादा असतील; पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी ते आबा आहेत

then the knot will be with me, NCP youth leader Rohit Patil warning to MP Sanjay Patil | ..तर गाठ माझ्याशी असेल!, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा 

..तर गाठ माझ्याशी असेल!, रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा 

तासगाव : आर. आर. आबांच्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावला तर रोहित पाटीलला हात लावला, असे समजावे. आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, गाठ माझ्याशी असेल, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते राेहित पाटील यांनी खासदार संजय पाटील यांना नाव न घेता दिला.

मणेराजुरी (ता. तासगाव) येथे विराेधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शेतकरी मेळावा व तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता. यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास आमदार सुमन पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, आर. आर. आबांच्या पश्चात जनता त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभी आहे. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस व पवार घराणे आबा कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे राहील.

रोहित पाटील म्हणाले, अजित पवार यांनी नेहमीच तासगाव-कवठेमहांकाळच्या प्रश्नांसाठी सहकार्य केले आहे. अजितदादा, जरी विरोधी पक्षनेते असले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहेत. आज आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय. या राज्यात कुठलंही सरकार असले तरी अजितदादा काम करू शकतात.

अजितदादा तालुक्यासाठी आबा आहेत

अजितदादा महाराष्ट्रासाठी दादा असतील; पण तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यासाठी ते आबा आहेत. आबांना या लोकांनी खूप साथ दिली आहे. या मातीनं आमच्यावर उपकार केले आहेत. आबांचा मुलगा म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत याची जाणीव मला असेल.

Web Title: then the knot will be with me, NCP youth leader Rohit Patil warning to MP Sanjay Patil