मिरज/बेडग : लक्ष्मीवाडी (ता. मिरज) येथील महालक्ष्मी मंदिरात शनिवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली. चार तोळे सोने, चांदी व दानपेटी असा सुमारे चार लाखांचा ऐवज चाेरट्यांनी लंपास केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआरही चोरट्यांनी गायब केले.आरग येथील पद्मावती मंदिरातीलचोरीची घटना ताजी असतानाच बेडग ते मंगसुळी रस्त्यावरील लक्ष्मीवाडी येथील मंदिरात चोरी झाल्याने मंदिर प्रशासनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराच्या समोरील दरवाजाचे कुलूप कटरने तोडून आत प्रवेश केला व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीच्या पादुका व इतर चांदीच्या वस्तू तसेच देवीचा मुखवटाही लंपास केला आहे.दानपेटी उचलून लगतच्या सटवाई देवीच्या मागील बाजूने शेतातून जाऊन ओढ्यात दानपेटी फोडून त्यातील सहा महिन्यांत जमा झालेली अंदाजे ४० हजार रक्कम लंपास केली आहे. ओढा पात्रात ५ पत्रावळी व अन्न पदार्थ असल्याने चोरट्यांनी चोरीपूर्वी किंवा नंतर जेवण केले असावे, असा अंदाज लावला जात आहे.
पुरावा सापडू नये म्हणून..चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळू नये म्हणून डीव्हीआरही चोरून नेला आहे. ही चोरी अंदाजे रात्री १ नंतर झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. सकाळी याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळताच मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी भेट दिली. त्यानंतर मिरजचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी भेट दिली.
श्वान मंगसुळी रस्त्यावर घुटमळलेअधिक तपासणीसाठी ठसे घेण्यात आले असून श्वान पथकही बोलाविण्यात आले होते. श्वान हे मंदिराभोवती फिरून सटवाई मंदिराच्या मागील बाजूस ओढ्यात पेटी टाकलेल्या ठिकाणी जाऊन लगतच्या उसातून बेडग-मंगसुळी रस्त्यावर जाऊन थांबले.