सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:01 IST2025-08-23T14:00:43+5:302025-08-23T14:01:00+5:30
पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे

सांगलीकरांना दिलासा; ‘कृष्णे’ची पाणीपातळी सात फुटांनी उतरली, रस्ते होणार रिकामे
सांगली : जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ‘कोयना’ आणि ‘वारणा’ दोन्ही धरणांतून शुक्रवारी विसर्ग बंद केला आहे. यामुळे कृष्णा नदीची दिवसात सात फुटाने पाणीपातळी कमी होऊन रात्री ३६.६ फूट झाली होती. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३० फुटापर्यंत पाणीपातळी कमी होईल, असा पाटबंधारे विभागाने अंदाज वर्तविला आहे. बहुतांशी रस्ते, पुलांवरील पाणीपातळी कमी होऊन वाहतूक सुरळीत सुरू होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.
कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणात ९८.८९ टीएमसी म्हणजेच ९३.९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करून पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबल्यामुळे कृष्णा नदीचीसांगली आयर्विन पूल येथे रात्री सात फुटाने उतरून ३६.६ फूट झाली होती.
शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत ३२ ते ३० फुटापर्यंत पाणीपातळी कमी होणार आहे. पाणीपातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी, बहे पुलाची पाणीपातळी कमी झाली. सांगली, मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरांत पाणी शिरले होते. तेथील पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरू केली आहे. या मार्गावरील अमणापूर, भिलवडी, ताकारी पुलांवरील वाहतूक सायंकाळपासून सुरळीत सुरू झाली आहे.
वारणा धरणाचे गुरुवारी सायंकाळीच दरवाजे बंद केले आहेत. वक्र दरवाजे बंद करून विद्युत गृहातून एक हजार ६३० क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे. वारणा नदीची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. यामुळे वारणा नदीवरील पूल, बंधारे शनिवारी रिकामे होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी (फूट इंचामध्ये)
- कृष्णा पूल कराड - २२
- बहे पूल - ८.१०
- ताकारी पूल - ३५.५
- भिलवडी पूल - ३८.६
- सांगली आयर्विन - ३६.६
- राजापूर बंधारा - ४२.५
रस्ते मोकळे होण्यास सुरुवात
कृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारपर्यंत पाण्यात होते. सायंकाळनंतर वारणा नदीचे पाणी कमी झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे या पूल, बंधाऱ्यावरील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, आमणापूर, भिलवडी हे पूल रिकामे झाल्यामुळे वाहतूक सुरू झाली आहे.
धरणातील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टीएमसी)/ टक्के
- कोयना - ९८.८९ - ९३.९६
- वारणा - ३१.६२ - ९२
- धोम - १३.१८ - ९८
- कण्हेर - ९.६८ - ९६
- उरमोडी - ९.८२ - ९८
तालुकानिहाय चोवीस तासांतील पाऊस
तालुका - पाऊस मिलिमीटरमध्ये
- मिरज - १.२
- जत - ०.२
- खानापूर - १
- वाळवा - १.५
- तासगाव - १
- शिराळा - ७.७
- आटपाडी - ०.५
- क.महांकाळ - ३.५
- पलूस - १
- कडेगाव - १.१