सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:26 IST2025-09-05T16:26:11+5:302025-09-05T16:26:54+5:30

भाजपसाठी प्रतिष्ठेची, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

The ward structure of Sangli Municipal Corporation is old but the tactics are new | सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत

सांगली महापालिकेची प्रभागरचना जुनीच, डावपेच मात्र नवे; काहीजण बंडखोरीच्या तयारीत

शीतल पाटील

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी जुनीच प्रभागरचना जाहीर झाल्याने त्याचा फायदा कोणाला आणि कोणाच्या गणितात गडबड होणार, यावर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. गतवेळी प्रभाग रचनेत केलेले बदल भाजपच्या पथ्यावर पडली होती. यंदाही तीच रचना कायम राहिल्याने भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी जुनीच प्रभागरचना कायम राहिली आहे. अपवाद केवळ दोन प्रभागांचा. त्या प्रभागात ही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार आहे. २०१८ च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी लढली होती. पण सात वर्षांत कृष्णेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यात विधानसभा निवडणुकीनंतर तर शहरात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या.

काँग्रेसचे दोन दिग्गज नेते जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी भाजप प्रवेश केला आहे. आधीच भाजपचे संघटन पालिका क्षेत्रात मजबूत आहे. त्यात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला अधिक बळ मिळाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या तयारी लक्ष घातले आहे. पालिका क्षेत्रातील दोन्ही आमदारही भाजपचेच आहेत.

याउलट काँग्रेसला अपक्ष खासदार विशाल पाटील व आमदार डाॅ. विश्वजित कदम यांचाच सहारा आहे. काँग्रेसमधील माजी नगरसेवकांनी भाजपशी सोयरीक केली. त्यामुळे भाजपसमोर तुल्यबळ उमेदवार देण्यापासून ते निवडणूक मॅनेजमेंट पर्यंत साऱ्या गोष्टींसाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागणार आहे. दुभंगलेल्या राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला मिरजेतून मोठा आशा आहेत. पण अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवडी यांचा मिरजेत प्रभाव आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी अस्तित्व वाचविण्याची खरी कसोटी ठरणार आहे.

भाजप शून्यावरून ४१ पर्यंत

२०१३ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने चिन्हावर निवडणूक लढविली नव्हती. स्वाभिमानी आघाडीच्या झेंड्याखाली भाजपचे उमेदवार मैदानात होते. तरीही, केवळ आठच नगरसेवक निवडणूक आले. २०१८ च्या निवडणुकीत मात्र भाजपने चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यात शून्यावरून थेट महापालिकेच्या सत्तेपर्यंत मजल मारली. भाजपचे ४१ जागा जिंकत बहुमताने महापालिका ताब्यात घेतली.

प्रभाग रचना बदलली, अन भाजप सत्तेत आली

महापालिकेच्या स्थापनेपासून काँग्रेसच्या हाती सत्ता होती. काँग्रेस नेतृत्वाचा प्रभाग रचनेवर प्रभाव असायचा. अपवाद केवळ २००८ चा होता. २०१४ नंतर देशात व राज्यात भाजपची सत्ता आली. प्रशासनाला हाताशी धरत भाजपने २०१८ च्या निवडणुकीसाठी अनुकूल प्रभाग रचना केली. पहिल्यांदाच कुपवाडपासून प्रभागाची सुरूवात केली. तत्पूर्वी सांगलीतील जामवाडीपासून प्रभाग रचना होत होती. २०१८ मध्ये जुन्या प्रभागात अनेक बदल झाले. नव्याने केलेली रचना भाजपच्या पथ्यावर पडली आणि भाजप पहिल्यांदाच सत्तेत आली.

काहीजण बंडखोरीच्या तयारीत

भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. प्रत्येक प्रभागात एकेका जागेसाठी दोन ते तीन इच्छुक आहेत. काहीजण अजूनही काठावर आहेत. कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. भाजप की अजित पवार गट अथवा महाआघाडीतील पक्षाची उमेदवारी घ्यायची? हे निवडणूक लागल्यानंतरच ठरविले जाणार आहे. काहींनी ऐनवेळी बंडखोरी करून सुरक्षित प्रभागातून निवडून येण्याचे डावपेच ही आखले आहेत.

गत निवडणुकीतील संख्याबळ

  • भाजप : ४१
  • काँग्रेस : २०
  • राष्ट्रवादी : १५
  • अपक्ष : २
  • एकूण : ७८

Web Title: The ward structure of Sangli Municipal Corporation is old but the tactics are new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.