FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:24 IST2022-02-22T14:23:33+5:302022-02-22T14:24:41+5:30
सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का? हा देखील प्रश्न आहे

FRP Price : ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावू; स्वाभिमानी संघटनेचा इशारा
सांगली : दोन टप्प्यांत एफआरपी देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला हिसका दाखवू असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. दोन टप्प्यांत एफआरपीची घोषणा शासनाने काल, सोमवारी केली. सरकारच्या या निर्णयावरुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
खराडे म्हणाले, हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत गाडणारा आहे. साखर सम्राटांच्या दबावापोटी ठाकेर सरकारने निर्णय घेतला आहे. साखर सम्राट नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शोषण करत आले आहेत. दोन टप्प्यांत एफआरपीच्या निर्णयामुळे त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे. त्याचा गैरफायदा घेत कदाचित तीन ते चार टप्प्यांतही एफआरपी दिली जाण्याचा धोका आहे. काही कारखानदार देणारही नाहीत, त्यामुळे हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा.
खराडे म्हणाले, ज्या शासकीय समितीच्या शिफारशीने हा निर्णय घेतला आहे, ते सरकारी अधिकारी दोन टप्प्यांत पगार घ्यायला तयार होतील का? असा प्रश्न आहे. सातव्या वेतन आयोगासह एकाच टप्प्यात भरभक्कम पगार घेणाऱ्यांना शेतकऱ्याची दुखणी कळणार नाहीत. सरकारमधील आमदार आणि मंत्रीही दोन टप्प्यांत मानधन घेतात का हादेखील प्रश्न आहे.
बेदाणा उत्पादकांना २३ दिवसानंतर पैसे, द्राक्ष उत्पादकांना गंडा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अडतवाल्याकडून फसवणूक, दूध उत्पादकांना दहा दिवसानंतर पैसे अशी शेतकऱ्याची लुटमार सुरु आहे. त्याला कोणी वालीच नाही अशी स्थिती आहे. या स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यामागे भक्कमपणे उभे रहायला हवे. याउलट शेतकरीविरोधी निर्णय घेतले जात आहेत, हे दुदैव आहे.
सरकारने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर रस्त्यावरची आरपारची लढाई लढावी लागेल. दिल्लीत सरकारला शेतकऱ्यांनी गुडघे टेकायला भाग पाडले, त्याचप्रमाणे ठाकरे सरकारलाही गुडघे टेकायला भाग पाडू.