सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच 

By संतोष भिसे | Updated: February 13, 2026 18:15 IST2026-02-13T18:08:58+5:302026-02-13T18:15:56+5:30

संगीता पाटील, देविका राजेघोरपडे, संध्या पाटील यांची नावे चर्चेत, पाठिंब्याचा बदल्यात अजित पवार गटालाही मिळू शकते संधी

The tussle for the post of Sangli Zilla Parishad President is between Walwa, Miraj and Jat | सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच 

सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी वाळवा, मिरज अन् जतमध्येच रस्सीखेच 

संतोष भिसे

सांगली : जिल्हा परिषदेतील बलाबल स्पष्ट झाल्यानंतर आता अध्यक्षपद कोणाला मिळणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. यासाठी भाजप महायुती आणि काँग्रेस आघाडीकडे अनेक महिला इच्छुक आहेत. वाळवा, मिरज अन् जत तालुक्यांमध्येच तुर्त अध्यक्षपदासाठी रस्सीखेच दिसत आहे.

अंतिम बलाबल पाहता महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंना सत्तास्थापनेची संधी आहे. दोघांचेही बहुमत अत्यंत काठावर आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ठोस बहुमतासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे बहुमत निर्विवाद होणार आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) १८, काँग्रेस ११, राष्ट्रवादी (अजित पवार) ६ आणि उद्धवसेना १ यांनी हातमिळवणी केल्यास एकत्रित संख्याबळ ३६ होणार आहे. 

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. ती प्रत्यक्षात आल्यास आघाडीला सत्तेचा सोपान दूर राहणार नाही. शिवाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यातही यश येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मोठा पक्ष या नात्याने राष्ट्रवादीची (शरद पवार) अध्यक्षपदासाठी दावेदारी प्रबळ ठरू शकेल. या पक्षाच्या सर्वाधिक सात जागा वाळवा तालुक्यातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपद या तालुक्याकडे जाऊ शकते.

वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याच्या मोबदल्यात अध्यक्षपदाची अट, पक्षनेत्यांची मिरजेत बैठक

येलूर गटातून निवडून आलेल्या या पक्षाच्या उमेदवार देविका राजेघोरपडे एका अर्थाने जायंट किलर ठरल्या आहेत. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या भावजय आणि जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक यांना पराभूत केले आहे. भाजपच्या जिव्हारी लागणाऱ्या पराभवांपैकी हा एक पराभव आहे. त्याचे बक्षीस म्हणून राजेघोरपडे यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीचा मान दिला जाऊ शकतो. पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची बहीण संगीता पाटील (कासेगाव) तसेच वाटेगावच्या अनुभवी सदस्या संध्या पाटील यांची नावेही नाव अग्रक्रमावर आहेत.

कांता वाटेगावकर (बोरगाव), मंदा माळी (पेठ), शीला मोहिते (पणुंब्रे तर्फ वारुण) आणि मीना पाटील (कवठेपिरान) या सदस्याही अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

भाजपने गणित जमविल्यास...

भाजप युतीने सत्तेचे गणित जमविल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय निंबवडेच्या माधवी पडळकर यांची दावेदारी प्रबळ असेल. त्याशिवाय साईतेजस्वी देशमुख (कोकरूड), शोभा खोत (आरग), कविता पाटील (संख) यादेखील सदस्या अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

राष्ट्रवादीने सशर्त पाठिंबा दिल्यास...

सत्ता स्थापण्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. या पक्षाने अध्यक्षपदाच्या अटीवर पाठिंब्याची भूमिका घेतल्यास सावित्री रवी (जाडरबोबलाद), सुजाता पाटील (देशिंग), राजेश्वरी नाईक (वाकुर्डे बुद्रूक), स्नेहल मोरे (एरंडोली) या सदस्या अध्यक्षपदासाठी पात्र आहेत.

Web Title : सांगली जिला परिषद अध्यक्ष पद: वालवा, मिरज और जत में रस्साकशी

Web Summary : सांगली जिला परिषद के अध्यक्ष पद, महिलाओं के लिए आरक्षित, के लिए मुख्य रूप से वालवा, मिरज और जत में प्रतिस्पर्धा है। दोनों गठबंधन सत्ता के लिए होड़ में हैं, जहां एनसीपी गुटों की भूमिका निर्णायक हो सकती है। विभिन्न दलों से प्रमुख उम्मीदवार उभर रहे हैं; बातचीत जारी है।

Web Title : Sangli Zilla Parishad President Post: Tug-of-War Between Walwa, Miraj, and Jat

Web Summary : Sangli Zilla Parishad's president post, reserved for women, sees competition primarily from Walwa, Miraj, and Jat. Both alliances vie for power, with potential kingmaker roles for NCP factions. Key candidates emerge from various parties; negotiations are underway.