Sangli: कणदूरमध्ये मिळतोय ताज्या गुळाचा गोडवा, शिराळा तालुक्यात हंगामातील एकमेव गुऱ्हाळ घर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:50 IST2026-01-06T16:48:58+5:302026-01-06T16:50:23+5:30
एकेकाळी गूळ निर्मितीसाठी शिराळा तालुका आघाडीवर होता. आता मात्र या उद्योग नामशेष होण्याच्या मार्गावर

Sangli: कणदूरमध्ये मिळतोय ताज्या गुळाचा गोडवा, शिराळा तालुक्यात हंगामातील एकमेव गुऱ्हाळ घर सुरू
सहदेव खोत
पुनवत : शिराळा तालुक्यातील कणदूर येथे यंदाच्या हंगामातील एकमेव गुऱ्हाळ घर सुरू आहे. तालुक्यात अन्यत्र मात्र हा उद्योग पूर्णपणे संपुष्टात आला आहे. एकेकाळी गूळ निर्मितीसाठी शिराळा तालुका आघाडीवर होता. आता मात्र या उद्योग नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वारणा पट्ट्यातील शाहूवाडी तालुक्यात मात्र दोन-तीन ठिकाणी गुऱ्हाळ उद्योग सुरू असल्याचे चित्र आहे.
एकेकाळी शिराळा तालुक्याची गूळ निर्मितीसाठी वेगळी ओळख होती. तालुक्यात शंभरावर गुऱ्हाळ घरे होती. प्रत्येक गावात या गुराळ घरांचा हंगाम प्रतिवर्षी सुरू व्हायचा. शेकडो लोकांना रोजगार मिळायचा. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. तालुक्यातील गुऱ्हाळ उद्योग जवळपास संपुष्टात आला आहे. कणदूर वगळता अन्य गावांत गुऱ्हाळ घरांचे केवळ अवशेष पाहायला मिळत आहेत.
जुन्या काळामध्ये प्रत्येक गावातील शेतकरी आपला ऊस तोडून गुऱ्हाळ घरांत आणायचे. त्याचे गाळप करून गूळनिर्मिती करायचे. मात्र, आता ही सर्व कामे अत्यंत कष्टाची आणि खर्चिक बनल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ उद्योगाकडे पाठ फिरविली आहे. एकंदरीत, शिराळा तालुक्यामध्ये एकमेव कणदूर येथे यावर्षी खवय्यांना ताज्या गुळाचा गोडवा चाखायला मिळत असून, अन्य गावांतील गुऱ्हाळ घरे मात्र कायमची बंद झाली आहेत.
गुऱ्हाळ उद्योग संपण्याची कारणे
- प्रचंड आर्थिक गुंतवणूक
- मनुष्यबळाची कमतरता
- गुळाला हमीभाव नसणे
- बाहेरच्या राज्यातून होणारी गुळाची आयात
- शासनाची उदासीनता
उद्योग टिकविण्यासाठी हे व्हायला हवे...
- गुळाला हमीभाव मिळायला हवा
- शासनाने प्रोत्साहनपर अनुदान द्यावे
- उत्पादन साहित्याचे दर कमी करायला हवेत
- बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवायला हवी .