विकास शहाशिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी येथे चितळ सोडून त्याचे प्रजनन करून संख्या वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. याला यश ही येत आहे. मात्र, या वाघांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणारा विशेष व्याघ्र संवर्धन दल येथे कार्यरत नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला आहे. मेळघाट येथे हा फोर्स कार्यरत आहे. मात्र, चांदोली प्रकल्पात अद्याप नाही. त्यामुळे येथील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनादृष्टीने हे दल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.चांदोली व कोयना अभयारण्यातील ६९०.६३ चौरस किलोमीटर क्षेत्र शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. केंद्रीय व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला तत्त्वतः मंजुरी दिल्यामुळे ताडोबा प्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. यातील चार वाघ चांदोली, तर चार वाघ कोयना प्रकल्प क्षेत्रात सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सह्याद्रीत वाघांची डरकाळी आता घुमणार आहे.केंद्राच्या व्याघ्र संवर्धन समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ताडोबातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, या वाघांच्या सुरक्षेसाठी असणारा स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स येथे आवश्यक आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकल्प क्षेत्रातील वाघांची संख्या लक्षात घेऊन सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला आहे. यात १२० प्रशिक्षित वन कर्मचारी तसेच अधिकारी असतात. सह्याद्री व मेळघाट येथे एकाचवेळी हा फोर्स मंजूर केला आहे. मात्र, मेळघाटवर हा कार्यरत झाला आहे. मग, चांदोली व्याघ्र प्रकल्पात अद्याप का नाही ?चितळांची संख्या पुरेशी हवी
- चांदोलीत वाघ आणायचा तर चितळांची संख्या पुरेशी हवी. म्हणून शासनाने सागरेश्वर, कात्रज आणि सोलापूर येथून चितळ आणून चांदोलीत सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी आठ हेक्टर क्षेत्राला कुंपण घालून प्रजननाद्वारे संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- राज्यात व भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संवर्धन दल कार्यरत आहे. सह्याद्री प्रकल्पासाठी या दलाची तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थापना करण्यासाठी प्रस्तावित केले होते. सदर दलास केंद्राकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. भविष्यात होणाऱ्या व्याघ्र पुनर्वसनाच्यादृष्टीने हे दल असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.