सांगली जिल्ह्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर; पीकस्थिती कशी, का करतात पैसेवारी, शेतकऱ्यांना काय फायदा.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:14 IST2025-10-04T19:14:25+5:302025-10-04T19:14:57+5:30
जिल्हाधिकारी यांच्याकडून पैसेवारी जाहीर

संग्रहित छाया
सांगली : खरीप हंगामातील पिकांची स्थिती आणि उत्पादनाचा अंदाज मिळविण्यासाठी पैसेवारी केली जाते. जिल्ह्यातील ७३६ गावांपैकी ६३३ गावांतील शेतजमिनीवर विविध पिकांची लागवड केली जाते, तर १०३ गावे रब्बी हंगामासाठी आहेत. खरीप हंगामातील सर्व ६३३ गावांतील पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील पीकस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून येते.
जर ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असल्यास, त्या गावातील शेतकऱ्यांना शासनाकडून विविध सोयीसुविधा प्रदान केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पैसेवारीला फार महत्त्व आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली जाते आणि ३० डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होते. पैसेवारीच्या आधारावर यंदाची पीकस्थिती कशी आहे आणि सरासरी उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रित असते.
जिल्ह्यात खरिपात दोन लाख ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरीप हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कडधान्य आणि फळबागांना परतीच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविला गेला आहे, जो खरीप पिकांसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे महसूल विभागाद्वारे जाहीर केलेल्या नजरअंदाज पैसेवारीवरून जिल्ह्यात पीकस्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यातील हंगामी पीक पैसेवारी
तालुका - ५० पैशांवर गावांची संख्या
मिरज - ७२
तासगाव - ६९
क. महांकाळ - ६०
जत - ५४
खानापूर - ६८
आटपाडी - २६
पलूस - ३५
कडेगाव - ५६
वाळवा - ९८
शिराळा - ९५
डिसेंबरला अंतिम पैसेवारी होणार जाहीर
महसूल विभागाने सध्या हंगामी पैसेवारी जाहीर केली असून, त्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाठविला आहे. अंतिम पैसेवारी डिसेंबर २०२५ रोजी निश्चित होणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.