मॉडीफाईड सायलेंसर पोलिसांच्या नजरेत पडला अन् चोरटा जाळ्यात अडकला; सांगलीत सात दुचाकींसह चार लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:42 IST2023-08-14T16:41:46+5:302023-08-14T16:42:23+5:30
घरातच दुचाकीची तोडफोड

मॉडीफाईड सायलेंसर पोलिसांच्या नजरेत पडला अन् चोरटा जाळ्यात अडकला; सांगलीत सात दुचाकींसह चार लाखांचा माल जप्त
सांगली : शहरात गस्ती ळी दुचाकीला बदलण्यात आलेला सायलेंसर पोलिसांच्या नजरेत पडला. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्यावर ‘वॉच’ ठेवला आणि अट्टल दुचाकी चोरटा अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राहुल सुरेश काळोखे (वय २०, रा. कर्नाळ रोड, दत्तनगर, सांगली) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून सात दुचाकीसह सुटे भाग असा चार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गस्त वाढवून गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर होते. या वेळी संशयिताची दुचाकी त्यांच्या नजरेस पडली. यात दुचाकीचा सायलेंसर दुसराच असल्याची शंका त्यांना आली.
यानंतर आठ दिवस त्याच्या पाळतीवर राहिल्यानंतर दुचाकी चोरून तो अक्षरश: त्या तोडून त्याचे पार्टच बाजारात विकत असल्याचे समोर आले. संशयित काळोखे हा दुचाकीची चोरी केल्यानंतर त्याचे भाग वेगवेगळे करत होता. तर सुटे भाग बसवून नव्या पद्धतीने दुचाकीही तो बनवत होता.
शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पोवार, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, गौतम कांबळे, संतोष गळवे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सहा गुन्हे उघडकीस
सांगलीतील चार ठिकाणाहून त्याने दुचाकी चोरल्याची कबुली पोलिस तपासात दिली. याशिवाय हातकणंगले व विश्रामबाग येथूनही त्याने दुचाकी लंपास केल्या होत्या. संशयित काळोखे हा पहिल्यांदाच रेकाॅर्डवर आला असला तरी त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले.
घरातच दुचाकीची तोडफोड
संशयित काळोखे हा घरातच पाठीमागच्या बाजूला चोरलेल्या दुचाकी तोडत होता. दुचाकी मॉडीफाय करण्याबरोबरच तो सुटे भाग विक्री करत असल्याचाही पोलिसांना संशय आहे.