ऊसतोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागतोय हजारोंचा भुर्दंड, ऊसतोड टोळ्यांकडून लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:14 IST2024-12-12T19:14:09+5:302024-12-12T19:14:27+5:30
साखर कारखाना नियंत्रण ठेवण्याची गरज

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागतोय हजारोंचा भुर्दंड, ऊसतोड टोळ्यांकडून लूट
महेश देसाई
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, तालुक्यात विविध कारखान्यांची ऊसतोडणी सुरू आहे. पण, उसाची मोठ्या प्रमाणात असलेली उपलब्धता, त्यात मजुरांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना उसाची तोडणी करण्यासाठी ऊसतोड टोळीच्या पाठीमागे लागावे लागत आहे व ऊसतोड करणाऱ्यांकडून आर्थिक व जेवणाची मागणी होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षी एकरी हजारोपर्यंत रक्कम घेऊन ऊस तोडला जायचा. मात्र, त्यातही यंदा आणखीन मजुरांची संख्या कमी असल्याने हा रेट वाढतच चालला आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांवर ऊसतोड मजुरांना पार्ट्या आणि हजारो रुपये देऊन ऊसतोड करण्याची वेळ आलेली आहे. अनेक मोठ्या ठिकाणी रकमा घेऊनही टोळ्या फरार झाल्याचे चित्र आहे. मजुरांअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे.
ऊसतोडणी लांबत चालल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कारखानदारांनी लक्ष देऊन कार्यक्षेत्रात नोंद असलेला ऊस योग्य वेळेत तोडून नेण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. कारखानदारांनी या ऊसतोड करणाऱ्या मुकादम, ठेकेदार, ऊसतोड यांच्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी आता करू लागले आहेत.
अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस अडचण
कवठेमहांकाळ तालुक्यात अपुऱ्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. रेल्वेचे छोटे भुयारी पूलही उसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकसाठी अडचणीचे ठरत आहेत. तर, वाहनधारकांना प्रवास करतानाही अडचण येत आहे. तर, राष्ट्रीय महामार्गावर ऊस ट्रॅक्टर टॉल्या उभ्या असतात. याकडे पोलीस प्रशासनाने कारवाई केली.
ऊसतोड करण्यासाठी विविध कारखान्यांच्या टोळ्या गावात आल्या असून, शेतकऱ्यांकडून हजारो रुपये घेतल्यानंतरच ऊस तोडणाऱ्या टोळ्या प्रसन्न होत असल्याने सगळीकडे हाच ट्रेंड सुरु झाला आहे. त्यामुळे कारखानदारांनी ही बाब गांभीर्याने घेत त्यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अन्यथा कारखानदारांच्या विरोधात उपोषणास बसणार आहे. -अंकुश कांबळे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी कोकळे.