पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:30 IST2025-11-06T12:29:52+5:302025-11-06T12:30:38+5:30
चार दशकांची मागणी पूर्ण

पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण; नवीन वर्षात गाड्या वाढणार, आज सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी
सदानंद औंधे
मिरज : पुणे-मिरजदरम्यान २८० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम नऊ वर्षांनंतर पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गाच्या दुहेरीकरणाची चार दशकांची मागणी अखेरीस पूर्ण झाली आहे. कोरेगाव, रहिमतपूर तारगाव या २३ किलोमीटर रेल्वेमार्गाचीरेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून गुरुवारी सुरक्षा पाहणी होणार असून, त्यानंतर नवीन मार्गांवरून रेल्वे गाड्या धावणार आहेत. या मार्गावर नवीन वर्षात आणखी जादा गाड्या मिळण्याची शक्यता आहे.
पुणे-मिरज दुहेरी मार्गावरून सध्या दिवसाला फक्त सहा एक्स्प्रेस व तीन पॅसेंजर धावत असल्याने प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. मध्य रेल्वेने पुणे-मिरज या २७९ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम २०१६ मध्ये सुरू केले होते. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आले.
दुहेरीकरणासाठी सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे कामाला वेळ लागला. पुणे ते मिरजदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात दुहेरीकरण पूर्ण झालेल्या नवीन मार्गावर वेगाच्या चाचणीत जास्तीतजास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली.
कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अंतिम टप्प्यात पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा सुरक्षा तपासणी करणार आहेत. सुरक्षा आयुक्त प्रथम ट्रॉलीवरून प्रवास करतील. त्यानंतर आठ डब्यांची विशेष रेल्वे कोरेगाव ते तारगाव या २३ किलोमीटर मार्गावर प्रतितास ६० ते १०० किलोमीटर गतीने धावणार आहे.
सध्या या मार्गावर, कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, चालुक्य, गोवा एक्स्प्रेस, कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस, काही विशेष एक्स्प्रेस व पाच पॅसेंजर गाड्या दररोज धावतात. दुहेरीकरणानंतर या मार्गाची क्षमता मोठी झाल्याने या मार्गावर गाड्या वाढविण्याची व पुण्यापर्यंत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसचा मिरजेपर्यंत विस्तार करण्याची प्रवाशांची मागणी आहे.
पुणे-मिरज मार्गावर धावणाऱ्या गाड्या
- दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर - ९
- आठवड्यातून एकदा धावणाऱ्या एक्स्प्रेस - ११
- आठवड्यातून दोन व तीन वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस - २६
- एकूण एक्स्प्रेस व पॅसेंजर - २७
१४ तासांचा मेगा ब्लॉक
कोरेगाव-तारगाव रेल्वे मार्गाच्या दरम्यान सुरक्षा तपासणीसाठी गुरुवारी सकाळपासून १४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरून धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेस व इतर गाड्या मिरजेतून पंढरपूर, दौंडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. गुरुवारी कोयना व वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून, महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच येणार आहे.
पुणे-मिरज मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण झाले आहे तर मिरज-लोंढा या १८० किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण-विद्युतीकरण यापूर्वीच पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावरून दिवसाला शंभरावर गाड्या धावण्याची क्षमता आहे. पुणे-हुबळी-पुणे, कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचाही वेग वाढणार आहे. यामार्गे दक्षिण व उत्तर भारतात गाड्या जाऊ शकतात. त्यामुळे दुहेरी मार्गांवर गाड्या वाढवाव्यात. मालवाहतुकीसाठीही रेल्वे स्थानकांचा विकास करावा. - सुकुमार पाटील, रेल्वे सल्लागार समिती सदस्य