Sangli Crime: बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अखेर अटक, बारा दिवस पोलिसांना दिला चकवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:14 IST2025-11-04T12:13:28+5:302025-11-04T12:14:12+5:30
आईजवळ झोपला असताना पहाटेच्या सुमारास तिघांच्या टोळीने त्याला पळवून नेले होते

Sangli Crime: बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला अखेर अटक, बारा दिवस पोलिसांना दिला चकवा
सांगली : सांगलीत विश्रामबाग चौकात फुगे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या राजस्थानी कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीतील इम्तियाज पठाण, वसीमा इम्तियाज पठाण (रा. मिरज) या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी शिराळा परिसरात अटक केली. टोळीतील इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज (रा. किल्ला भाग, मिरज) याला यापूर्वीच अटक केली आहे.
राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी (रा. कनवास, जि. कोटा) हा रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतो. सांगलीत विश्रामबाग चौकात रस्त्याकडेलाच त्यांनी संसार मांडला आहे. पत्नी, वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह तो राहताे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी कुटुंब रस्त्याकडेला झोपले होते. एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीने त्याला पळवून नेले. पहाटेच्या सुमारास आईला बाळ जवळ दिसले नाही, म्हणून शोधाशोध सुरू केली. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना हा प्रकार समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीने बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिरजेतील टोळीने बालकाचे अपहरण करून त्याची विक्री सावर्डे (जि. रत्नागिरी) येथील दाम्पत्याला केल्याची माहिती मिळाली. भाऊबीजेच्या दिवशी पोलिसांनी इनायत गोलंदाज याला अटक करून बाळाला मातेच्या स्वाधीन केले.
अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार इम्तियाज पठाण व वसीमा पठाण हे दोघे मात्र पसार होते. इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने पोलिसांना चकवा दिला. इनायतला अटक केल्यानंतर पोलिस मागावर असल्याचे पाहून तो पळाला होता. गेले दहा-बारा दिवस तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. गुन्हे अन्वेषणचे पथक व विश्रामबाग पोलिस त्याचा माग काढत होते. परंतु, तो चकवा देत फिरत होता. अखेर विश्रामबाग पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने रविवारी शिराळा परिसरात दोघांना अटक केली. सोमवारी न्यायालयात हजर केले असता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांचन तपास करत आहेत.
इम्तियाज रेकॉर्डवरील गुन्हेगार
इम्तियाज पठाण याच्याविरुद्ध खंडणी, फसवणूक, विनयभंग, दुखापत, आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत. त्याची पत्नी वसीमा ही सावर्डे (जि. रत्नागिरी) येथील आहे. तिच्या ओळखीनेच तेथील मूलबाळ नसलेल्या दाम्पत्याला दोघांनी बाळाची विक्री केली होती. पहिल्या टप्प्यात १ लाख ८० हजार रुपये घेतले होते. उर्वरित रक्कम घेण्यापूर्वीच टोळीचा छडा लागला.